कुरखेडा: मी निलंबित झाल्यास तुमच्या घरी येऊन आत्महत्या करेल’; महिला तलाठ्याची उपोषणकर्त्यांना धमकी


गडचिरोली : ‘मी निलंबित झाल्यास तुमच्या घरी येऊन आत्महत्या करेल’; महिला तलाठ्याची उपोषणकर्त्यांना धमकी

कुरखेडा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उपसा, तस्करी, विटभट्टी विरोधात कारवाईसाठी उपोषण करणाऱ्यांना महिला तलाठ्याने आत्महत्येची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपोषणकर्त्यांनी कुरखेडा पोलिसांत ध्वनिफीतसह तक्रार दाखल केली आहे. मागील वर्षभरापासून जिल्हाभरात मनमर्जी पद्धतीने गौण खनिजाची अवैध तस्करी सुरू आहे.





तक्रारी करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. यामुळे त्रस्त कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येथील नागरिकांनी कारवाईसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. बुधवारी उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने प्रशासनाकडून कारवाई संदर्भात हालचाली चालू असल्याचे लक्षात येताच येथील महिला तलाठ्याने उपोषणकर्त्यांपैकी चेतन गाहाने याला फोन करून ‘मी निलंबित झाल्यास तुला सोडणार नाही, तुझ्या घरी येऊन आत्महत्या करेल.’ अशाप्रकारची धमकी दिली. यामुळे उपोषणकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांनी या प्रकरणाची पोलिसांत तक्रार केली आहे. दोघांतील संभाषणाची ध्वनिफीतदेखील असून यात ती महिला तलाठी धमकी देत असल्याचे स्पष्ट ऐकू येत आहे.

अधिकाऱ्यांना सोडून कर्मचाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यातील रेती तस्करीचा मुद्दा गंभीर आहे. याविषयी प्रत्येक तालुक्यात ओरड आहे. अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे तस्कर निर्ढावले आहे. त्यामुळे कारवाईचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लहान कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. यातूनच असे प्रकार घडत असल्याची चर्चा कर्मचारी वर्तुळात आहे.

सौजन्य: लोकसत्ता

Post a Comment

Previous Post Next Post