लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी बोलाविल्याचा धसका घेत वनक्षेत्र सहाय्यकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

भंडारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी बोलाविल्याचा धसका घेत वनक्षेत्र सहाय्यकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तुमसर तालुक्यातील गायमुख जंगलात बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अजाबराव सीताराम लोहारे (५२, रा. परसोडी, ता. उमरेड, जि. नागपूर ) असे मृताचे नाव आहे.
लोहारे हे तुमसर तालुक्यातील लेंडझरी वनपरिक्षेत्रांतर्गत विटपूर बिटमध्ये क्षेत्र सहाय्यक म्हणून कार्यरत होते. ते बुधवारी सकाळी कर्तव्यावर जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, त्यांचा मृतदेह गायमुख जंगलातील खैराच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.


या घटनेची माहिती वन विभागासह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. आंधळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात वडिलांना चौकशीसाठी बोलाविले होते. त्याचा धसका घेत त्यांनी आत्महत्या केल्याचे लोहारे यांचा मुलगा मनीषने आंधळगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश मट्टामी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post