शेतातील विहिरीत पडले अस्वल


गोरेगाव : तालुक्यातील हल्बीटोला तेढा येथील शेतशिवारात रविवारी (दि. ४) रात्री दरम्यान रामू खांडवाये यांच्या शेतातील विहिरीत अस्वल पडल्याची घटना सोमवारी (दि.५) सकाळी उघडकीस आली. हा प्रकार झाल्यानंतर काशिनाथ भेंडारकर यांनी गोंदिया जिल्हा आपत्ती निवारण समिती व वन विभाग गोरेगावला याची माहिती दिली. माहिती मिळताच जिल्हा आपत्ती निवारण समिती व वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले.

विहिरीत पडलेल्या अस्वलाला मोठ्या शिताफीने बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची गर्दी होती. विहिरीच्या बाहेर येताच अस्वलाने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र शेतातच कुठेतरी अस्वल असल्याची भीती आता परिसरातील शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे या परिसरात आता दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. शेतातील बऱ्याच विहिरींना तोंडी नसल्याने रात्रीच्या वेळेस मार्ग शोधताना वन्यप्राणी विहिरीत पडण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post