वाघ दिसताच..... तो चढला झाडावर... पण

आरमोरी : जंगलात गुरे चारताना वाघाने गुराख्याच्या दिशेने धाव घेतली; पण वेळीच सावध झालेल्या गुराख्याने प्रसंगावधान राखत झटपट झाडावर चढून स्वतःचे प्राण वाचविले. मात्र, वाघाने गुराख्याच्या गायीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना रामपूर जंगलातील कक्ष क्रमांक ४२ मध्ये बुधवारी घडली.


रामपूर येथील गुराखी संदीप सदाशिव मोहुर्ले (वय ३५) हा नेहमीप्रमाणे दुपारी बारा वाजेच्या सुमारास जंगलातील कक्ष क्रमांक ४२ मध्ये गुरे चारायला गेला होता. यावेळी मानवी शिकारीसाठी चटावलेला टी वन (टय्या) हा वाघ संदीपच्या मागून हल्ला करण्यासाठी येत होता. अचानक संदीपची नजर त्याच्यावर पडताच क्षणाचाही वेळ न गमविता त्याने चपळाईने शेजारच्या झाडाचा आश्रय घेत त्यावर चढाई केली. त्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले. 'काळ आला होता; पण वेळ आली नव्हती' या म्हणीचा प्रत्यय त्याला आला.








वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक राजू कुंभारे, वनरक्षक भारत शेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन अतिशय चपळाईने झाडावर चढून स्वतःचे रक्षण करणाऱ्या गुराख्याचे कौतुक केले. त्यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गायीचा पंचनामा केला आणि जनावरांना जंगलात चरायला घेउन जाणे धोक्याचे असल्याने जांगलात मनाई केली आहे.

 गुराखी संदीपवरील हल्ला अयशस्वी झालेल्या टी-वन वाघाने लगेच आपला मोर्चा गायीच्या कळपाकडे वळविला. काही क्षणातच वाघाने गायीवर हल्ला करून तिच्या नरडीचा घोट घेतला. जीव वाचवत घाबरलेल्या अवस्थेत संदीप झाडावरुनच वाघाला पाहत होता. वाघाने प्रवीण ठेंगरी यांच्या गाईला ठार केले.

 संदीपकडे मोबाइल फोन असल्यामुळे त्याने गावकऱ्यांशी व गायीच्या मालकाशी संपर्क करून  घटनास्थळी बोलवून घेतले. गावकरी घटनास्थळी आल्यानंतरच तो झाडावरून खाली उतरला.

त्यामूळे गुराख्याने जनावरे चरायला घेऊन जाण्याचे काम कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावकऱ्यांपुढे आता नवीन समस्या निर्माण झाली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post