आला रे आला हत्ती वडसा तालुक्यात आला...

 
देसाईगंज,  : दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यात असलेला हत्तींचा कळप पुन्हा वडसा तालुक्यात दाखल झाल्याची माहिती असून या कळपाने काही शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचे कळते.

दोन दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर परिसरातून इंदोरा, गांधीनगर मध्ये जंगली हत्तींचा कळप पहावयास मिळाला होता. तसेच नागरिकांनी पहावयास धाव घेतली असता एका दुचाकीला बलाढ्य हत्तीने फुटबॉल सारखे खेळत दुचाकीचे नुकसान केले याबाबत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता भंडारा जिल्ह्यातून हत्तींच्या कळपाने प्रवास करीत वडसा तालुक्यात प्रवेश केल्याची माहिती असून प्रवासात काही शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचेही कळते. या सर्व घडामोडीने मात्र वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे. जिल्ह्यात हत्तींच्या कळपाने प्रवेश करून या आधी मोठे नुकसान केले आहे.

तर हत्तींना गावात प्रवेश करू न देण्यासाठी हुल्ला पार्टी सुद्धा उपस्थित आहे मात्र तरी सुद्धा हत्तींचा कळप भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील जंगलातुन जाण्यास तयार दिसत नाही हे लक्षात येत आहे. भविष्यात हे हत्ती इथल्याच जंगल परिसरात वावरतील काय ? हत्तींच्या प्रवासाने किती नुकसान होणार ? हत्ती याच जंगल परिसरात राहणार तर वनविभाग आवश्यक त्या उपाययोजना करणार काय ? असे संशोधनात्मक प्रश्नही उपस्थित होत आहे. आधीच जिल्ह्यात वाघांच्या धुमाकूळीने नागरिक धास्तावले असतांना पुन्हा हत्तींच्या कळपाने मात्र अधिक भयभीत झाले असल्याचे दिसून येत आहे. हत्तींच्या प्रवेशाने मात्र आता वनविभागाची दमछाक होणार असून पुन्हा काय उपयोजना करते या कडे लक्ष लागले आहे. वनविभाग नागरिकांना जंगलात जाण्यास, हत्तींना बघायला जाण्यास वारंवार मज्जाव करीत आहे हे मात्र नक्की.

Post a Comment

Previous Post Next Post