दोन दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

कुरखेडा : भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन यात एकजण जागीच ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील चिखली फाट्यावर रविवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. भूषण मधुकर मेश्राम (वय २०, राहणार कुरखेडा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

भूषण मेश्राम हा आपल्या दुचाकीने महादेवगड देवस्थान अरततोंडी येथेदर्शन घेण्यासाठी गेला होता. सोबत त्याचा भाऊ आकाश मेश्राम हासुद्धा होता. दर्शन घेत काला खाऊन तो कुरखेडाकडे दुचाकीने परत येत असताना मुख्य मार्गावरील चिखली फाट्याजवळ कुरखेडाकडून गेवर्धाकडे येणाऱ्या दुचाकी (एम.एच.३३ वाय. ६५५५) शी जोरदार धडक झाली. यात दोन्ही दुचाकी चालक रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडले. मात्र, आकाश मेश्राम याला जराही धक्का लागला नाही. दोन्ही दुचाकीस्वार गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडले होते. याचवेळीदेसाईगंजवरून कुरखेडाकडे युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख प्रा. उमा चंदेल, युवासेना उपजिल्हा प्रमुख सज्जाद पठाण, नगरसेवक अतुल झोडे यांनी अपघातग्रस्तांना कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले; परंतु डॉक्टरांनी भूषण मेश्राम याला मृत घोषित केले. दुसरा वाहनचालक गंभीर व बेशुद्ध अवस्थेत होता. त्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही. दोन्ही दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नव्हते. शुभमच्या डोक्याला मार लागला. हेल्मेटमुळे त्याचे प्राण वाचले असते.

Post a Comment

Previous Post Next Post