अखेर गडचिरोली येथील खून प्रकरणी वंदना अलाम या महिलेला झाली अटक

गडचिरोली:- . विविध हॉटेलमध्ये मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नागेश प्रकाश यानलवार ( 35 ) याचा मृतदेह रामनगर वॉर्डातील एका नालीमध्ये गुरुवारी आढळून आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गडचिरोली पोलिसांनी जलदगतीने तपास करून हत्येप्रकरणी शनिवारी एका महिलेला अटक करण्यात यश मिळविले. वंदना अलाम (45) रा. वासेरा ता. सिंदेवाही असे आरोपी महिलेचे नाव आहे.

नागेश यानलवार हा मूल येथील रहिवासी असून धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील आपल्या मामाकडे राहत होता. काही महिन्यांपूर्वी तो गडचिरोली शहरात भाड्याच्या घरात राहून विविध हॉटेलमध्ये काम करून उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, गुरुवारी सकाळच्या सुमारास रामनगरातील एका नालीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. गडचिरोलीपोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच घटनेप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास हाती घेतला. वेगाने तपास करीत या हत्येमागे एका महिलेचा हात असल्याची बाब पुढे आली. त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी सध्या रामनगरात निवासी असलेल्या वंदना अलाम या महिलेला अटक करून चौकशी केली असता, तिनेच हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक नागेश व आरोपी वंदना यांची तीन महिन्यापूर्वी ओळख झाली होती.
मात्र, 27 जुलैच्या रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यांच्यातील वाद विकोप्याला गेल्याने आरोपी वंदनाअलाम हिने लोखंडी अवजाराने नागेशच्या डोक्यावर मारहाण करीत त्याची हत्या केली. त्यांनतर मृतदेह रामनगरातील एका नालीमध्ये फेकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी वंदनाला अटक केली असून रविवारी तिला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या नेतृत्वात एपीआय पूनम गोरे, चेतन चव्हाण, शकील सय्यद, धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, चंद्र कांबळे आदींनी केली. प्रकरणाचा पुढील तपास एपीआय चेतन चव्हाण करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post