भाऊ.... चक्क पूर्ण पोलिस स्टेशन बोगस... हवालदारांपासून इन्स्पेक्टरपर्यंत सारेच नकली

पाटणा - बिहारमध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याच्या अनेक कहाण्या नेहमीच चर्चेत येत असतात. बिहारमध्ये बोगस पोलीस कर्मचारी पकडले जात असतात. मात्र यावेळी गोष्टी जरा अधिकच गंभीर आहे. यावेळी एक संपूर्ण पोलीस स्टेशनच बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे पोलीस ठाणे गेल्या आठ महिन्यांपासून परिसरात सक्रिय होते. तसेच लोकांकडून पैसे उकळत होते. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हा मुख्यालयात सुरू असलेल्या या बोगस पोलीस ठाण्याची कुणाला कानोकान खबर नव्हती. हे पोलीस ठाणे बांका शरहातील एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये सुरू होते.

याबाबत बांकाच्या ठाणेदारांनी सांगितले की, एका गोपनीय सूचनेच्या आधारावर एका गुन्हेगाराला अटक करण्यासाठी पोलीस गेले होते. जेव्हा छापेमारी करून हे पथक माघारी परतत होते. तेव्हा बांका गेस्ट हाऊससमोर एक अनोळखी महिला आणि तरुण पोलिसांच्या ड्रेसमध्ये असल्याचे दिसून आले. संशयाच्या आधारावार त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा बनावट पोलीस ठाण्याचं बिंग फुटलं.

पोलिसांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेली महिला स्वत:ची ओळख पोलीस अधिकारी म्हणून करून देत होती. तसेच ती बिहार पोलिसांच्या गणवेशात होती. तसेच तिच्याकडे एक अनधिकृत पिस्तूलही सापडले. तर पकडण्यात आलेल्या अन्य आरोपीचं नाव आकाश कुमार आहे. तो आपली ओळख चौकीदार म्हणून करून देत होता. त्याने सांगितले की, फुल्लीडुमर येथील भोला यादव याने त्याला पोलीस म्हणून भरती करून बांका येथील या कार्यालयात तैनात केलं होतं

आपल्या कामाबाबत अनिताने सांगितले की, जेव्हा कधी सरकारी घरे वगैरे बांधली जात तेव्हा तिथे तपास करण्यासाठी ती जात असे. तर अटक करण्यात आलेल्या आकाशच्या म्हणण्यानुसार भोला यादवला ७० हजार रुपये देऊन तो या बनावट पोलीस ठाण्यात नोकरी करत होता. ठाणेदारांनी दिलेल्या माहितीनुसार या कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना पोलिसांचा गणवेश आणि अवैध पिस्तूल उपलब्ध करून देण्यामध्ये फुल्लीडुमरचे भोला यादव नावाचा मुख्य आरोपी सहभागी होता.





Post a Comment

Previous Post Next Post