मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला २० वर्षांचा कारावास

जिवती : स्वतःच्या अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर शारीरिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला २० वर्ष सक्तमजुरीसह कारावास व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे.

घरी कोणी नसताना वासनाधीन बापाने स्वतःच्या मुलीवर राहत्या घरी शारीरिक अत्याचार केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने जिवती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यावरून जिवती पोलीस स्टेशन येथे कलम ३७६, ३७६ (२) (एफ), ५०६ भां.द.वि. सहकलम ४, ५ (एन), ६ पोक्सोप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. हा गुन्हा तपासात घेतल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक वर्षा काळे यांनी आरोपीला अटक करून आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानिशी

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्ह्यातील साक्ष तसेच पुरावे ग्राह्य धरून नराधम बापाला २० वर्षे सक्तमजुरीसह कारावास आणि सहा हजार दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली आहे. सरकारतर्फे अॅड. स्वाती देशपांडे, कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार बळीराम बोरकर यांनी काम पाहिले.

Post a Comment

Previous Post Next Post