अन् बिबट्या गावात येऊन रात्री कोंबड्या, कुत्री, शेळ्यावर मारत आहे ताव

गडचिरोली : पुलखल परिसरात असलेल्या बिबट्याला पाळीव प्राण्यांची चटक लागली आहे. रोज रात्री गावात येऊन कोंबड्या, कुत्री, शेळ्या आदींवर ताव मारत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिवसा शेतात काम केल्यानंतर गावकरी लवकरच झोपतात. याचा फायदा घेत रात्री ११ वाजताच्या सुमारालाच बिबट्या गावात प्रवेश करत आहे. १५ दिवसांपूर्वी तो गावातील काही नागरिकांच्या नजरेस पडला होता. चार दिवसांपूर्वी रात्री सदाशिव रोळे यांच्या शेळीच्या पिलाला बिबट्याने पकडले. सदाशिव रोळे यांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पळून गेला. याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर वन विभागाने गाव परिसरात चार कॅमेरे लावले. त्यानंतरही बिबट्याने श्यामराव चापले व महेश गेडाम यांच्या पाळीव कुत्र्यांची केली. त्र्यंबक रोहणकर, उमाजी ठाकरे यांच्या घरी शिरून कोंबड्यांवर डल्ला मारला. मंगळवारी आरएफओ पेंदाम, क्षेत्र सहायक एस. टी. नवघरे यांच्यासह टायगर मॉनिटरिंग टीमने या परिसरात पाहणी केली. शेतात बिबट्याचे पंज्यांचे ठसे दिसून आले. पाहणी करतेवेळी ग्राम पंचायत सदस्य खुशाल ठाकरे, प्रवीण कन्नाके, विजयानंद रोळे, श्यामराव चापले, उमेश पालकर, सोनू जवादे, त्र्यंबक रोहणकर, अमित रोळे, अक्षय गोरडवार आदी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post