खा. संजय राऊतांचे व्याही नवी मुंबई महानगर पालिकेचे नवे आयुक्त

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या अटकेत तुरुंगात असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे व्याही अर्थात राऊत यांची मुलगी पूर्वशीचे सासरे राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, अभिजित बांगर यांची ठाणे महापालिका आयुक्त पदासाठी धाडण्यात आले आहे.

महापालिका निवडणूक झाल्यावर नगरसेवकांच्या समोर महासभेत, कोरोना काळात केलेल्या भ्रष्ट कारभाराचा लेखाजोखा विचारण्यात येईल. तो देवू लागू नये म्हणून, आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वतःची बदली मागून घेतली. अशी चर्चा मंत्रालयात आहे. तर, बांगर हे महाविकास आघाडी सरकारप्रती मवाळ भूमिका ठेवून होते. त्यामुळे, त्यांची प्रशासकीय गोची करण्यासाठी भाजप आणि शिंदे शिवसेनेने ठाणे मनपा आयुक्तपदी बांगर यांची नियुक्ती केली असल्याचे बोलले जाते.

राजेश नार्वेकर हे याआधी ठाण्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काम केले आहे. ते रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ग्रामीण भागात त्यांनी स्वच्छ भारत आणि पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबवल्या. तसेच त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाच्या कालखंडात रायगड जिल्हा हगणदारीमुक्त झाला. त्यानंतर त्यांनी 2018मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांची बदली ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी आणि आता, नवी मुंबई आयुक्त पदावर नियुक्ती झाली आहे.

आयुक्त राजेश नार्वेकर हे शिवसेना नेते खा. संजय राऊत यांचे व्याही  उद्धव ठाकरे गटातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे 'अच्छे दिन' आले असल्याने ठाकरे गटात सध्या आनंदाचे वातावरण आहे. ज्यामुळे, प्रशासनाचा गैरवापर करून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न महापालिकेत उद्धव ठाकरे गटाकडून इतर भाजप आणि शिंदे गटावर होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. 

मुंबई अति. आयुक्तपदी होणार होती नियुक्ती पण..

शिवसेनेची एकहाती सत्ता आणि शिवसेनेचा आर्थिक समीकरणांचा जीव असणाऱ्या  मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर राजेश नार्वेकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता काही महिन्यांपूर्वी वर्तवली जात होती. परंतु, राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सत्तापालटामुळे नार्वेकर यांची ती संधी हुकली असल्याचे बोलले जात आहे. आपल्या नातेवाईकांना ऐनकेन क्रिमी पोस्टवर बसवायचे उद्योग ठाकरे गटात राजरोसपणे त्यावेळी सुरु होते. 

पूर्वशी राऊत चित्रपट 'निर्माती' 

राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचं सूत्रांनी सांगितले. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post