उद्यानामधील मॉर्निग वॉकच्या पायवाटांवर ब्लिचिंग पावडर फवारणी करा संदीप खांडगेपाटील यांची मागणी

विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील पदपथावर, उद्यानामधील मॉर्निग वॉकच्या पायवाटांवर तातडीने ब्लिचिंग पावडर फवारणी तातडीने करण्याची लेखी मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

प्रभाग ३४ मध्ये नेरूळ सेक्टर ६,८,१० तसेच सारसोळे व कुकशेत गावाचा समावेश होत आहे. या परिसरात पालिका प्रशासनाने पदपथ व मॉर्निग वॉकच्या पायवाटांवर ब्लिचिंग पावडरची फवारणी करून स्थानिकांना त्रासातून मुक्त करावे, यासाठी पालिका प्रशासनाकडे सातत्याने लेखी मागणी करूनही आमच्या मागणीच्या निवेदनाला पालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जात असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

केवळ निवेदने फॉरवर्ड केल्याशिवाय आपल्या कार्यालयातून कोणतीही कारवाई केली जात नाही. सिवूडस, वाशी तसेच अन्य विभागातील माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी यांनी मागणी केल्यावर काही तासात अथवा दुसऱ्या दिवशी लगेच त्यांच्या विभागात ब्लिचिंग पावडरची फवारणी केली जाते. सोशल मिडियावर त्याची छायाचित्रे प्रकाशित झालेली पहावयास मिळतात. प्रभाग ३४ मधील नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील रहीवाशी तसेच सारसोळे व कुकशेतचे ग्रामस्थ नवी मुंबईकर नाहीत काय? आमचा प्रभाग ३४ पालिका प्रशासनाने नवी मुंबईतून वगळला आहे काय? आमच्या परिसरातले नागरिक महापालिका प्रशासनाचा कर भरत नाही काय, याबाबत महापालिका प्रशासनाने लेखी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनातून केली आहे.

गेली साडे तीन महिने मुसळधार पाऊस सुरू आहे. नेरूळ सेक्टर ६,८,१० मधील रहीवाशी तसेच सारसोळे व कुकशेतचे पदपथ, उद्यानातील मॉर्निग वॉकच्या पायवाटा शेवाळल्या असून निसरड्या झाल्या आहेत. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणाहून चालणे अवघड झाले आहे. तेथून ये-जा करताना घसरून पडण्याच्या व हाता-पायाला जखमा होण्याचे प्रमाणही वाढीस लागले आहे. या ठिकाणी लवकरात लवकर पालिका प्रशासनाने ब्लिचिंग पावडरची फवारणी करणे आवश्यक आहे. आपणाकडे सातत्याने लेखी मागणी करत आहोत. समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देत आहोत. आपण ज्यांना निवेदने फॉरवर्ड करतात, त्या लोकांकडून आजतागायत कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा आपणाकडे निवेदन सादर करावे लागत आहे. समस्येचे गांभीर्य जाणून घ्या. संबंधितांना तातडीने प्रभाग ३४ मधील पदपथ व मॉर्निग वॉकच्या पायवाटांवर ब्लिचिंगग पावडरची फवारणी करण्याचे निर्देश द्यावेत, काय कार्यवाही केली आहे, याबाबत लेखी अहवाल मागवून घेण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post