शाळेत सरस्वतीचा फोटो का ?, त्यांची पूजा का करायची ?; छगन भुजबळांच्या विधानानं नवा वाद



मुंबई - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भुजबळांच्या या विधानावरून भाजपा आणि ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला आहे. शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिलं नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही त्यांची पूजा कशाला करायची? असं विधान आमदार छगन भुजबळांनी केले आहे.

अखिल भारतीय समता परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना भुजबळांनी हे विधान केले. छगन भुजबळ म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त ३ टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.


तसेच ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा. हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाकीचे देव वैगेरे नंतर बघूया असं विधान छगन भुजबळांनी केले. भुजबळांच्या या विधानावर भाजपा नेते राम कदम यांनी आक्षेप घेत त्यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आमचे देव आणि देवतांबद्दल इतकी चीड का? हा खरा सवाल आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राम कदम म्हणाले की, आज यांना आमच्या देवी देवतांचे फोटो खटकतात. उद्या मंदिरेही खटकतील. मंदिरे कशाला हवीत. ती पाडून टाका असंही म्हणतील. सर्वच महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत. परंतु राष्ट्रवादीची ही पद्धत कुठली? हिंदुत्वाबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीला का राग आहे? यांच्यासोबत पेग्विन सेनेचे नेते आहेत त्यांची काय भूमिका आहे? हिंदु देवी देवतांचा अपमान राष्ट्रवादीने केला आहे त्यांनी माफी मागायला हवी असं राम कदमांनी म्हटलं. 



राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी हिंदु धर्मीयांचा अपमान केला आहे. कुठल्याही महापुरुषाचा अपमान कुणीही केला नाही. परंतु जाणूनबुजून भुजबळांनी शाळेत सरस्वती, शारदा मातेचा फोटो का असावा? असे तारे तोडले आहेत. हिंदु महासंघ या विधानाचा आक्षेप करतो. महाराष्ट्रात विरोधी पक्षात आल्यानंतर जातीवाद करायचा हे राष्ट्रवादीचं जुन धोरण छगन भुजबळ अंमलात आणत आहेत. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असं विधान ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post