बीपीसीएल प्रशासन आणि वाहतूक पोलीसांच्या दुर्लक्षपणामुळे बिपीसीएल कंपनी समोर अपघात.

विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील रहिवासी काॅ. राजेश ठाकूर यांचा काही दिवसापूर्वी बिपीसीएल कंपनी समोरच असलेल्या बेकायदेशीर पार्किंग मुळे दुर्दैवी अपघात झाला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातानंतर बीपीसीएल आणि वाहतूक विभाग जागे होऊन काही दिवसांसाठी बेकायदेशीर पार्कींग हटवण्याचा दिखावा करण्यात आला होता. परंतु काही दिवसांनंतर पुन्हा बीपीसीएल प्रशासन आणि वाहतूक पोलीसांच्या आशिर्वादाने पुन्हा भेंडखळ येथील बिपीसीएल गेट समोर व आजूबाजूच्या परिसरात बेकायदेशीर पार्कींग सुरू झाली आहे.त्यामुळे अपघातांना आयतेच आमंत्रण मिळत आहे.


दि 15/9/2022 रोजी सकाळी आर पी आय उरण तालुका उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर यांच्या समोर बीपीसीएल जवळ पुन्हा एकदा बस आणि सिलेंडर ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. वाहतूक पोलिसांना खडसावल्या नंतर बेकायदेशीर पार्कींग हटवण्याचे काम चालू झाले. रात्री तर पुर्ण रस्ता या गाड्यांनी व्यापलेला असतो. वाहतूक पोलीस फक्त दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात मग्न असतात.मात्र बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या व अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई कधी होईल ? असा सवाल शिवाजी ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. बीपीसीएल कंपनी गेट समोर व आजूबाजूच्या परिसरात अनेक वाहने वेडीवाकडी लावल्याने अनेकांचे अपघात होत आहे. बीपीसीएल प्रशासन व पोलीस प्रशासन येथे एखाद्याचा अपघात होऊन बळी जाण्याचे वाट बघत आहे की काय असा सवालहि शिवाजी ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. बीपीसीएल कंपनी गेटसमोर व आजूबाजूच्या परिसरात बेकायदेशीर पार्किंग बंद करून रस्ता मोकळा कसा होईल यासाठी वाहतूक पोलीस प्रशासन व बिपीसीएल कंपनी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी आता जनतेतून होऊ लागली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post