मुलीने अपमान केल्याने आईची आत्महत्या..


नागपूर : मोबाईल वापरण्यास हटकल्यामुळे १६ वर्षीय मुलीने आईशी वाद घातला. मुलीच्या वागण्याचा आईच्या मनावर विपरीत परिणाम झाला. अपमानित झाल्यामुळे आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. अंकिता (३५, सुरेंद्रगढ) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चशिक्षित असलेली अंकिता गृहिणी असून पतीचा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची मुलगी बारावीची विद्यार्थिनी असून मुलगा दहावीत शिकतो.

मुलगी नेहमी मोबाईल हाताळत असते. ती समाजमाध्यमांवर सक्रिय आहे. त्यामुळे अंकिता यांनी मुलीची समजूत घातली. तिने मोबाईल वापरण्यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. काही दिवस तिने आईच्या लपून मोबाईल वापरला. आईला ती मोबाईल वापरताना दिसली. त्यामुळे आई पुन्हा चिडली. यावेळी मुलीने आईशी मोबाईल वापरण्यावरून वाद घातला.

आईशी मोठय़ा आवाजाने बोलली. त्यामुळे तिला अपमान झाल्याचे वाटले. मुलीच्या वागण्यामुळे दुखावलेल्या अंकिता हिने दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी दुपारी घरात कुणी नसताना सिलिंग फॅनला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी मुलगी आणि मुलगा घरी आल्यानंतर त्यांना आई गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांनी वडिलांना फोन करून कळवले. काही वेळातच वडील घरी आले. त्यांनी गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Post a Comment

Previous Post Next Post