यावर्षी धान पिकाला बोनस मिळणार काय? बोनस जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

गडचिरोली : शासनाने शेतकऱ्यांच्या धान पिकाला आधारभूत हमीभाव २०४० रुपये दिला असला तरी सदर हमीभाव शेतकऱ्यांच्या धानाला अपुरा पडत आहे; कारण आजच्या स्थितीला शेतीची रासायनिक खत, कीटकनाशक व औषधांच्या किमती गगनाला भिडल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना धान पिकाची शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शासनाने यंदा धान पिकाला बोनस जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकरी हा राबराब राबून शेतीची मशागत करतो; परंतु कधीकधी निसर्ग हा दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावून घेतो. म्हणजे कधी अतिवृष्टी तर कधी पाण्याचा दुष्काळ अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. आधीच

शेतकरी हा सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाला आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या खाईत लोटले गेल्यामुळे शेवटी पर्याय नसल्याने आत्महत्येचे पाऊलसुद्धा उचलतात. मशागत करण्यासाठी लागणारा खर्च म्हणजे नांगरणी, मजुरी यांच्यामध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे शेती करणे महागात पडत आहे.

यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी दुबार, तिबार पेरणी करूनसुद्धा धान पीक हे मातीमोल झाले. शासनाने अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर केली असली तरी नुकसान भरपाईचे पैसे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत. तरी शासनाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देऊन खात्यात पैसे टाकावेत व शेतकऱ्याची वरील गंभीर बाब लक्षात घेऊन बोनसचा निर्णय घ्यावा.

Post a Comment

Previous Post Next Post