तुमचे सहकार्य असेल तर स्पर्धा नक्कीच यशस्वी होतील - जिल्हा क्रीडाधिकारी सुवर्णा बारटक्के

दिलीप अहिनवे, मुंबई 
भांडुप, दि. ११ : मुंबई उपनगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व सह्याद्री विद्यामंदिर भांडुप (प.) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी सभेचे उत्तम आयोजन करण्यात आले होते. मुंबई उपनगरमधील शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला. सभेत प्राथमिक प्रवेशिका ऑनलाईन पध्दतीने कशा भराव्यात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मानखुर्द ते कुर्ला व कुर्ला ते मुलुंड या विभागातील सर्व खाजगी, विना अनुदानित, अनुदानित व मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भांडुप मधील नामांकित व नेहमीच स्पर्धेत असणाऱ्या सह्याद्री विद्यामंदिर शाळेचे आयोजन अतिशय उत्तम होते.
       
  या सभेला मार्गदर्शक म्हणून मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडाधिकारी सुवर्णा बारटक्के, तालुका क्रीडाधिकारी प्राजक्ता सावंत, क्रीडाधिकारी अमोल दंडवते, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजोग ढोले, हॅण्डबॉलच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक रश्मी आंबेडकर, मुंबई महापालिका मुलुंड 'टी' व भांडुप 'एस'विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर, सह्याद्री शाळेचे मुख्याध्यापक खोबरेकर व ऑनलाईन प्रशिक्षण देणारे निलेश खानापूरकर हे उपस्थित होते.
          आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध कबड्डीपटू व मुंबई उपनगरच्या विद्यमान जिल्हा क्रीडाधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी उपस्थितांना सांगितले की, स्पर्धांची तुम्हाला सर्व माहिती आहे. अडीच वर्षे कोरोना महामारीमुळे सर्व शासकीय क्रीडा स्पर्धा बंद होत्या. आता देखील कालावधी खुप कमी आहे. आपण सर्व मुलांसाठी मेहनत घेत आहोत. सध्या प्रतिकूल परिस्थिती आहे. शाळांमध्ये परीक्षा सुरु आहेत. तरी देखील १५ ऑक्टोबर पर्यंत तुमच्या प्राथमिक प्रवेशिका यायला हव्यात. तुमचे सहकार्य असेल तर स्पर्धा नक्कीच यशस्वी होतील. प्राथमिक प्रवेशिका संदर्भात निलेश खानापूरकर यांनी सुंदर मार्गदर्शन केले.
          हॅण्डबॉलच्या राज्य क्रीडा मार्गदर्शक रश्मी आंबेडकर यांनी सभा संपल्यानंतर मुंबई महापालिकेच्या शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या समस्या समजावून घेतल्या. तसेच प्रत्येक समस्येवर उपाययोजना म्हणून उत्तम मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुंबई महापालिका कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर, सुनिलदत्त माने, सुभाष पाटील, रघुनाथ सोनवणे व रवींद्र पाटील हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post