केंद्र सरकारकडून उद्योगपतींना १० लाख ९ हजार ५१० कोटी रुपयांची कर्जमाफी


राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर निशाणा
देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे शेतकर्‍यांच्या कृषीमालाला हमीभाव नाही, युवकांना रोजगार नाही, आणि महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून उद्योगपतींना १० लाख ९ हजार ५१० कोटी रुपयांची कर्जमाफी केली. शेतकर्‍यांचा तोंडचा घास उद्योजकांच्या कर्जमाफीसाठी हिरावण्यात आला अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.


रविकांत वरपे म्हणाले की, देशातील बड्या उद्योजकांचे गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने १० लाख ९ हजार ५१० कोटी रूपयांची कर्जे माफ केली आहेत. जो बळीराजा १२५ कोटी पेक्षा अधिक जनतेला पोसतो त्या बळीराजाचे कर्ज माफ करायचे असेल तर फक्त १ लाख कोटी रुपये लागतात, तरुणांना रोजगार द्यायचा असेल तर लाखो कोटींची गुंतवणूक सरकारने करणे अपेक्षित आहे.



परंतु देशातील सर्वसामान्य जनतेचा पैसा मोठ्या उद्योग समूहांवर उधळला जातो. सामान्य जनतेकडून फक्त हजारो रूपयांची कर्जे सक्तीने वसूल केली जात आहेत. परंतु हजारो कोटींची कर्जे घेऊन बुडणार्‍या उद्योजकांना राईट ऑफच्या नावाखाली माफी दिली जाते.


वरपे म्हणाले की, महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला आहे त्यांना कोणत्याही पद्धतीचा दिलासा दिला नाही. परंतु नरेंद्र मोदी सरकारने त्यांच्या जवळच्या आवडत्या उद्योजकांचे कर्ज मात्र माफ करून देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठे ग्रहण लावलेले आहे. याचे परिणाम सर्वसामान्य नागरिकांना येणार्‍या काळात अधिक भोगावे लागतील. हे सरकार देशातील सर्वसामान्य जनतेशी प्रतारणा करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post