सुरजागड लोह खाण विरोधी आंदोलनाचे नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेने स्विकारावे : काॅ. अमोल मारकवार यांनी राज्य अधिवेशनात मांडला ठराव

गडचिरोली ( १ नोव्हेंबर) : निसर्ग आणि आपल्या संस्कृतीची पिढ्यांनपिढ्या जोपासना करुन जीवन जगणारा गडचिरोलीतील माडीया गोंड आदिवासी समाजावर सुरजागड लोह खाणीचे संकट ओढवले असून या स्थानिक जनतेच्या खदान विरोधी आंदोलनाचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेने स्विकारावे असा ठराव काॅ. अमोल मारकवार यांनी राज्य अधिवेशनात मांडला.

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र तर्फे सध्या सुरू असलेल्या २३ व्या राज्य अधिवेशनात सुरजागड लोह खाण विरोधी प्रस्ताव मांडतांना पुढे काॅ. अमोल मारकवार म्हणाले की, खाणीमुळे देशातील पेसा ,वनाधिकार कायदे आणि संविधानिक तरतूदींचे भंग शासन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. नुकतीच पोलिसी दबावात वाढीव उत्खननाची जनसुनावणी करण्यात आली. यात पत्रकार आणि सुरजागड इलाख्यातील पारंपारिक प्रमुखांनाही खदानी ला विरोध करतील म्हणून येवू दिले नाही. ब्रिटिशांच्या राजवटीत नसेल एवढी मनमानी सुरजागड लोह खाणीसाठी करण्यात येत असून खदान विरोधी आंदोलनाच्या नेत्यांवर वारंवार खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर सुरजागड लोह खाण विरोधी आंदोलन चालविण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने स्थानिकांच्या आंदोलनाचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व करावे, अशी विनंतीही राज्य अधिवेशनात काॅ. अमोल मारकवार यांनी केली.या अधिवेशनात महाराष्ट्र राज्यतील २५ जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी झाले.

या अधिवेशनात अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ.डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी.गावीत,आमदार. कॉ.विनोद निकोसे ,राज्य सरचिटणीस कॉ.डॉ. अजित नवले,कॉ.किसन गुजर,अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष. पी.के.प्रसाद ( तामिळनाडू) इत्यादींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्याचे ठरवले.

Post a Comment

Previous Post Next Post