3500 हून अधिक नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेचा संदेश देत नवी मुंबई हाफ मॅरेथॉन यशस्वी

3500 हून अधिक नागरिकांच्या सहभागातून स्वच्छतेचा संदेश देत नवी मुंबई हाफ मॅरेथॉन यशस्वी
   

विरेंद्र म्हात्रे उपसंपादक नवी मुंबई : स्वच्छता आणि आरोग्य या परस्परपूरक गोष्टी असून धावणे हा आरोग्यासाठी अत्यंत उत्तम व्यायाम मानला जातो. त्यामुळे धावण्याच्या माध्यमातून आरोग्य संवर्धनासह शहर स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या मान्यतेने, लेट्स सेलिब्रेट फिटनेस या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन’ मध्ये 3250 हून अधिक नागरिकांनी रितसर नोंदणी करीत सहभाग घेतला तसेच 500 हून अधिक शहर स्वच्छता आणि आरोग्याविषयी जागरूक नागरिक स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले.


          पाम बीच मार्गावर सकाळी 5.30 वा. स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनचा शुभारंभ 21 किमी गटापासून करण्यात आला. त्यानंतर अर्ध्या तासाने 10 किमी व अर्ध्या तासाने 5 किमी गटातील धावपटू धावले. याप्रसंगी महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार,वाहतुक विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्री. राहुल गायकवाड, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव, तुर्भे विभागाचे विभाग अधिकारी श्री. सुखदेव येडवे,शिवसेना नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार शिवसेना शाखा प्रमुख श्रीकांत भोईर उपस्थित होते. माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनीही याप्रसंगी उपस्थित राहून सहभागी धावपटूंना शुभेच्छा देत प्रोत्साहन दिले. 

          लेट्स सेलिब्रेट फिटनेस सारखी सेवाभावी संस्था स्वत: पुढाकार घेऊन शहर स्वच्छतेच्या संदेश प्रसारणासाठी हाफ मॅरेथॉनसारखा उपक्रम आयोजित करते व नवी मुंबई शहराप्रती असलेले प्रेम अभिव्यक्त करते ही कौतुक करण्यासारखी व प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने अनुकरणीय करावी अशी बाब असून त्याबद्दल संस्थेच्या प्रमुख श्रीम. रिचा समित यांचा याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला.
 
          21 किमी अंतराच्या स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये 14 ते 29 वयाच्या पुरूष गटातील बबन शिंदे यांनी 1 तास 11 मि. 37 सेकंदात 21 किमी अंतर पार करून सर्वोत्तम कामगिरी केली. महिलांमध्ये 30 ते 44 वयोगटातील जयलक्ष्मी बालकृष्णन यांनी 1 तास 44 मि. 55 सेकंदात 21 किमी अंतर पार करून प्रथम पारितोषिक पटकाविले.
 
          45 ते 59 वर्ष महिला गटात पुजा नायर यांनी 1 तास 54 मि. 13 सेकंदात 21 किमी अंतर पार केले तसेच 30 ते 44 पुरूष गटात शशी दिवाकर यांनी 1 तास 18 मि. 14 सेकंदात, 45 ते 59 पुरूष गटात पुरण सिंघल यांनी 1 तास 38 मि. 03 सेकंदात, 60 वर्षे व त्यापुढील वयोगटात श्री. सुनील शेट्टी यांनी 1 तास 52 मि. 03 सेकंदात 21 किमी अंतर पार केले.

          प्रत्येक वयोगटातील प्रथम तीन क्रमांकाच्या महिला व पुरूष विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करून सन्मानीत करण्यात आले. 
अशाचप्रकारे 10 किमी व 5 किमी रनमधील विविध वयोगटातील प्रथम तीन क्रमांकाच्या महिला व पुरूष विजेत्यांनांही पारितोषिके प्रदान करण्यात आली. 
या स्पर्धेच्या ठिकाणी ओला, सुका व घरगुती घातक कचरा वर्गीकरणाचा संदेश प्रसारित करण्यासाठी ओलू, सुकू व घातकू हे तीन कच-याच्या डब्याचे प्रतिक दर्शविणारे मॅस्कॉट उपस्थितांमध्ये फिरून कचरा वर्गीकरणाचा प्रचार करीत होते. विशेष म्हणजे 21, 10, 5 अशा किमीच्या गटाची धाव सुरू होतानाही कचरा वर्गीकरणाचा संदेश प्रसारित व्हावा म्हणून पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या धावपटूंकडे अनुक्रमे हिरवा, निळा व काळ्या रंगाचे फुगे हातात देण्यात आले होते. 
  
          स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेला असून यामध्ये समस्त नवी मुंबई नागरिकांच्या सक्रिय योगदानाचा महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला सामोरे जात असताना लेट्स सेलिब्रेट फिटनेस सारखी स्वयंसेवी संस्था हाफ मॅरेथॉ़नसारखा भव्य उपक्रम आयोजित करते आणि त्यामधून स्वच्छतेच्या संदेश प्रसाराचे कार्य करते व त्यामध्ये नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात हे नवी मुंबईकरांच्या स्वच्छतेविषयी कृतीशीलतेचे व सजगतेचे प्रतिक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post