म्हणून उद्धव ठाकरेंनी मंगळवारी विधान परिषदेत भाषण करणं टाळलं



नागपूरच्या थंडीत एरवी पांढर्‍या कपड्यात दिसणारे नेते पहील्या दिवसापासून रंगीबेरंगी 'जॅकेटमध्ये' दिसत होते. शोक प्रस्ताव, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न यावर घोषणा देऊन हिवाळी अधिवेशनाचा पहीला दिवस संपला होता. दुसर्‍या दिवसापासून खऱ्या अर्थाने अधिवेशनाला सुरुवात होणार होती. सकाळी 9 वाजता महाविकास आघाडीची बैठक ठरली होती. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते. त्यानंतर ते विधानपरिषदेत भाषण करणार असं सांगण्यात आलं. पत्रकारांनी सकाळपासून विधानभवनच्या गेटवर कॅमेरे लावले होते. सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्यांच्यासोबत इतर नेते विधानभवनात दाखल झाले. उध्दव ठाकरे येणार असल्यामुळे ठाकरे गटाचे नेते गेटजवळ डोळे लावून थांबले होते.
साधारण 9 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले. बैठकीला सुरुवात झाली. आज उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सभागृहात सामना बघायला मिळणार ही चर्चा होती. वार्ताहर गॅलरीमधली जागा हळूहळू भरत होती. ग्रामपंचायतीचे निकालही येणार होते. प्रत्येक आमदार फोनवर निकालाची माहिती घेत होता. निकालाची चिंता सगळ्यांनाच होती.

खोके विरूद्ध बोके
विरोधकांची जोरदार रणनीती ठरणार, पायर्‍यांवर आंदोलन होणार असं एकंदरीत चित्र दिसत होतं. शिंदे गटाच्या आमदारांचा अंदाज घेण्यासाठी शिवसेना कार्यालयात डोकावलं तर तिथे वेगवेगळ्या घोषणांचे फलक मांडून ठेवले होते. 50 खोक्यांची घोषणा आमदारांच्या जिव्हारी लागत होती. "आमची लोकांमध्ये इतकी बदनामी करतायेत, त्यासाठी त्यांना धडा शिकवणारं आंदोलन आम्हीही करणार. त्यांच्या आंदोलनाची हवा काढणार," असं सत्ताधारी आमदार सांगत होते. साडेदहाच्या सुमारास विरोधी पक्षाचे आमदार नेहमीप्रमाणे 'गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी', ओला दुष्काळ जाहीर करा... 50 खोके एकदम ओके या घोषणा देऊ लागले. पण अचानक सत्ताधारी आमदार फलक घेऊन पायर्‍यांवर आले. '50 आमदार एकदम ओके, घरी बसवले माजलेले बोके' हे फलक झळकवत घोषणा देऊ लागले.
विरोधी पक्षाचे आमदार हे बघून संभ्रमात पडले. अजितदादा सत्ताधारी आमदारांकडे बघू लागले. काहीवेळाने सत्ताधाऱ्यांना आम्ही कसं जमिनीवर आणलं. 50 खोक्यांचा आरोप यांना मान्य आहे का? अशी टीका विरोधी पक्षांचे आमदार करू लागले. पण आंदोलनामध्ये माध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून होत होता. दोन्ही गटाचे आमदार समोर येऊन माध्यमांशी बोलत होते. 11 वाजत आले होते. विधानसभा सुरू होण्याची वेळ झाली होती. त्यामुळे दोन्ही गटाने आंदोलन आटोपतं घेतलं. सभागृहात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. विधानसभेत अजित पवारांनी कामांना स्थगिती देण्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधक आक्रमक झाले. अजित पवार म्हणाले, "आमच्या 7-7 टर्म झाल्या, पण असं कधी केलं नाही. त्यावर फडणवीसांनी उत्तर देत म्हटलं, "हो आम्ही कमी वेळा निवडून आलो. पण काही गोष्टी तुमच्याकडूनच शिकलो आहे."

फडणवीस विरूद्ध खडसे
दुसरीकडे विधानपरिषदेत उद्धव ठाकरे येण्याची लगबग सुरू होती. 12 वाजता विधानपरिषद सुरू झाली. मिलिंद नार्वेकर परिषद गॅलरीत आले. तेव्हा आता उध्दव ठाकरेही सभागृहात येतील असं सर्वांना वाटत होतं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 83 कोटींची जमिन 2 कोटींना दिल्याचा आरोप करत नागपूर खंडपीठाने या निर्णयाला स्थगिती दिल्याचं म्हटलं. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायची की नाही याची खात्री अनिल परबांकडे पाहून करत होते. प्रश्नोत्तरे मागे टाकत गोंधळ सुरू झाला. उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृह 15 मिनिटं तहकूब केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत येऊन बसले. 15 मिनिटांनंतर एकनाथ खडसे म्हणाले विरोधी पक्षनेते हे 'पॉईंट ऑफ इन्फर्मेशनवर' बोलत होते. तितक्यात फडणवीस म्हणाले, पॉईंट ऑफ इन्फर्मेशनवर चर्चा होते का? एकनाथ खडसे विरूद्ध देवेंद्र फडणवीस असं चित्र परिषदेत होतं.

...आणि उध्दव ठाकरे आलेच नाहीत
एकनाथ खडसे म्हणाले, "83 कोटींचा भूखंड 2 कोटींमध्ये दिला. याआधी ज्यांच्यावर आक्षेप घेतला त्यांनी राजीनामे दिले. मग मुख्यमंत्री का राजीनामा देत नाहीत." विरोधकांनी पुन्हा गोंधळ सुरू केला. उपसभापती निलम गोऱ्हे विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होत्या. उपसभापतींनी देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी दिली. फडणवीस बोलायला उठले. ते म्हणाले, "नाथाभाऊ तुम्ही सभागृहाची दिशाभूल करताय.” ते कोर्टाची ऑर्डर वाचू लागले. विरोधक गोंधळ घालू लागले. शिवसेना आमदार अनिल परब हे उपसभापतींकडे पाहून हातवारे करू लागले. तितक्यात फडणवीस म्हणाले, " हे तुमच्यावर दबाव आणतायेत." त्यांच्या आवाजाचा पारा वरच्या पट्टीतला होता. उपसभापतींनी देवेंद्र फडणवीस बोलताना, मधेच सभागृह पुन्हा 15 मिनिटांसाठी तहकूब केलं. मग सत्ताधारी आमदार हे चुकीचं आहे असं ओरडून सांगू लागले.

देवेंद्र फडणवीसही हे बरोबर नाही असं ओरडू लागले. पण सभागृह तहकूब झालेलं होतं. उपसभापती खुर्चीवरून निघून गेल्या होत्या. सर्व नेते सभागृहातच थांबले. फडणवीस समोर बसलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना म्हणाले, “अरे खोदा पाहाड निकला चुहा भी नही. नाथाभाऊ तुम्ही पेपरच्या बातम्यांवर बोलताय. मी कोर्टाच्या ऑर्डरवर बोलतोय.” 12.30 वाजून गेले होते. आज विदर्भातील विषयांवरच्या प्रस्तावावर चर्चा होणार होती. उध्दव ठाकरेही सभागृहात आले नव्हते. सभागृह सुरू झालं. देवेंद्र फडणवीस कोर्टाची ऑर्डर वाचू लागले. विरोधी आमदारांच्या प्रश्नांवर उत्तर देऊ लागले. काहीवेळाने पुन्हा गोंधळ झाला. उपसभापतींनी विधानपरिषद दिवसभरासाठी तहकूब केली.
विधानपरिषदेत उध्दव ठाकरे महापुरुषांचा अपमान आणि कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर भाषण करणार असं सांगितलं जात होतं. पण मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची संधी विरोधकांना पुन्हा मिळणार नव्हती.

हा मुद्दा पेटलेला असताना, उध्दव ठाकरेंनी जर महापुरुषांचा अपमान आणि कर्नाटक सीमा वाद हे भाषण केलं तर मूळ मुख्यमंत्र्यांचा राजीनाम्याचा विषय मागे पडेल आणि उध्दव ठाकरेंच्या भाषणाची चर्चा होईल, असं कदाचित त्यांना वाटलं म्हणून उध्दव ठाकरेंनी भाषण करणं टाळलं असावं. अशी चर्चा नंतर विधानभवनात रंगली होती.

विधान भवन परिसरात उध्दव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाला मिळालेलं नवं कार्यालय पाहीलं आणि तिथून ते रेडीसन ब्लू हॉटेलकडे निघाले. विधिमंडळातले विषय उध्दव ठाकरेंनी रेडीसन ब्लूमध्ये बसून मांडले.

विधिमंडळातल्या मिडीया स्टॅन्डवर बोलायला 'कम्फर्टेबल' वाटत नाही असं त्यांनी काहींना सांगितलं.

पत्रकार परिषद घेऊन ते मुंबईकडे रवाना झाले. कामकाजात सहभागी होणार का? या प्रश्नावर त्यांनी कोणतही ठोस उत्तर दिलं नाही. शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून विधानपरिषदेत न जाण्याची परंपरा उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत कायम ठेवली.

Post a Comment

Previous Post Next Post