तथागत गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी विपश्यनेचा मार्ग सांगितला होता म्हणून मी नागपूरात आलो आहे

अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. नागपूरमधल्या काटोल मार्गावरच्या फेटरी या ठिकाणी धम्म नागा विपश्यना केंद्र आहे. या ठिकाणी विपश्यना करण्यासाठी ते सात दिवस मुक्काम करणार आहेत. आज सकाळी नागपूर विमानतळावर अरविंद केजरीवाल यांचं आगमन झालं.

विपश्यनेसाठी नागपूरच का निवडलं?
नागपुरात पोहचल्यानंतर त्यांना माध्यमांनी विपश्यनेसाठी नागपूर का निवडलं असा प्रश्न विचारला. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी उत्तर दिलं. अरविंद केजरीवाल म्हणाले, “मी दरवर्षी विपश्यना केंद्रात जातो. ज्या ठिकाणी विपश्यना सुरू असेल त्या ठिकाणी मी जाणं पसंत करतो. देशात अनेक केंद्रं आहेत. मागच्या वर्षी मी जयपूरला गेलो होतो. यावर्षी नागपूरच्या केंद्रावर विपश्यना सुरू आहे त्यामुळे मी इथे आलो आहे.” असं उत्तर अरविंद केजरीवाल यांनी दिलं

१९९६ पासून मी विपश्यना करतो आहे
१९९६ पासून मी विपश्यना करतो आहे असंही अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. तथागत गौतम बुद्धांनी अडीच हजार वर्षांपूर्वी विपश्यनेचा मार्ग सांगितला होता. त्याचा आपल्याला आजही भरपूर लाभ होतो. प्रत्येकाने विपश्यना केली पाहिजे असंही मत अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केलं. यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडले आणि निघून गेले.

विपश्यना म्हणजे नेमकं काय?
विपश्यना ही तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली ध्यान पद्धती आहे. प्रचलित अर्थाने विपश्यना ही जगभरात पोहचलेली आहे. विपश्यना या शब्दाचा अर्थ स्वतःच्या आत डोकावणं असा होतो. विपश्यना ध्यान पद्धती ही कुणालाही करता येते. साधारण या वर्गाचा कालावधी हा सात ते दहा दिवसांचा असतो. या कालावधीत पूर्ण मौन पाळणं आवश्यक असतं. ज्या केंद्रावर विपश्यना घेतली जाणार आहे त्या ठिकाणी येणाऱ्या साधकांच्या भोजनाची तसेच निवासाची व्यवस्था करण्यात आलेली असते. या कालावधीत सात्विक भोजनावर भर दिला जातो. या दहा दिवसांमध्ये अपेयपान, धूम्रपान, मांसाहार वर्ज्य असतो.

Post a Comment

Previous Post Next Post