बाजार समिती आवारातील पाचही मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : पांडुरंग आमले

बाजार समिती आवारातील पाचही मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : पांडुरंग आमले

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची लेखी मागणी सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
तुर्भेस्थित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील सर्वोच्च बाजार समिती असून ही बाजार समिती राज्यातील कृषी अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या बाजार समिती आवारात कांदा बटाटा मार्केट, भाजी मार्केट, फळ मार्केट, किराणा दुकान मार्केट, धान्य मार्केट अशी पाच मार्केट कार्यरत आहे. या बाजार समिती आवारामध्ये समितीचे कर्मचारी, अधिकारी, व्यापारी व त्यांचे कर्मचारी, खरेदीदार, माथाडी, मापाडी, शेतकरी, वारणार, पालवाल, मेहता कर्मचारी, स्थानिक वाहतुकदार व बाहेरगावाहून कृषी माल घेवून येणारे वाहतुकदार असा जवळपास लाखापेक्षा अधिक लोकांचा येथे दररोज वावर असतो. बाजार समिती आवारात सर्वप्रथम १९८० च्या सुमारास कांदा बटाटा मार्केट कार्यरत झाले व त्यानंतर १९९४ ते ९६ या कालावधीत उर्वरित चार मार्केट कार्यरत झाले आहेत. ही मार्केट बांधून जवळपास तीन ते साडेतीन दशकाचा, कांदा बटाटा मार्केटला चार दशकांचा कालावधी उलटलेला असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनातून महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
या पाचही मार्केटची बांधकाम स्थिती जाणून घेणे आवश्यक आहे. बाजार समिती आवारातील पाचही मार्केटचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यास मार्केट धोकादायक अवस्थेत आहे का सुस्थितीत आहे, याचा उलगडा होणे शक्य होणार आहे. कांदा बटाटा मार्केट यापूर्वीच बाजार समिती प्रशासनाने धोकादायक घोषित केलेले आहे. उद्या मार्केटची पडझड झाल्यास हजारोंच्या संख्येने जिवितहानी होण्याची भीती आहे. येथील गाळ्यागाळ्यामध्ये माथाडी वर्ग कार्यरत आहे. त्यामुळे बाजार आवारातील प्रत्येक घटकाच्या जिवित सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर बाजार समिती आवारातील पाचही मार्केटचे बाजार समिती प्रशासनाच्या सहकार्याने स्ट्रक्चरल ऑडिट करुन घेण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post