लोकांच्या आवाजाने वाघ पळाला अन् दादाजीचा जीव वाचला

सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत नाचनभट्टी बिटातील उमरवाही परिसरात शेळ्या राखणाऱ्या गुराख्यावर अचानक वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. उटी (माल) येथील गुराखी दादाजी गंगाराम नन्नावरे (६५) व हंसराज कन्नाके (30) हे नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी उमरवाही येथील जंगल परिसररात शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी उमा नदीत उतरले व परत घाटावर चढत असताना झुडपांचा फायदा घेऊन वाघाने दादाजीवर हल्ला केला. यामुळे हंसराज घाबरला. कसेबसे स्वत:ला सावरत शेतातील लोकांना त्यांनी आवाज दिला.

लोकांच्या आवाजाने वाघ पळाला व दादाजीचा जीव वाचला. परंतु यामध्ये दादाजीला गंभीर दुखापत झाली. सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले. त्वरित वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक कडून केली जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post