मोठेपणा हा गुण पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो - कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर



संस्कार विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न


*प्रतिनिधी : दिलीप अहिनवे*
पेण, दि. २३ : रायगड जिल्ह्यातील संस्कार विद्यालय, गडब शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा २२ जानेवारी रोजी रायगड जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. शाळेतील छोटा शिशु ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांचे उत्तम सादरीकरण केले. शाळेचे विद्यार्थी, पालक व गावातील बहुसंख्य नागरिकांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.


कार्यक्रमाचे उदघाटन डोलवी गावचे सरपंच परशुराम म्हात्रे यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून मुंबई महापालिका 'टी' विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर, के. पी. पाटील, प्रकाश पाटील, सुभाष पाटील, दिनेश पाटील व मनोहर चवरकर, ग्रामपंचायत चे सर्व नवनिर्वाचित सदस्य तसेच दिनेश म्हात्रे, विश्वनाथ पाटील, संदीप म्हात्रे व प्रथमेश मोकल हे उपस्थित होते.


उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवदत्त कोठेकर यांनी सांगितले की, जो दुसऱ्यांना सन्मान देतो तोच खरा सन्माननीय असतो. माणूस तेच देऊ शकतो जे त्याच्याजवळ आहे. मोठेपणा हा गुण पदाने नव्हे तर संस्कारांनी प्राप्त होतो. अशा या संस्कार विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचे अध्यक्षपद भुषवण्याचा मान संस्कार विद्यालयाचे अध्यक्ष संजय चवरकर यांनी मला दिला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद !

माझे प्राथमिक शिक्षण याच गडब गावच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. त्याच शाळेच्या प्रांगणात या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुलांनी सादर केलेले सर्व कार्यक्रम अतिशय सुंदर झाले. विद्यार्थी व शिक्षकांनी खुप मेहनत घेतली होती. विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांचे कौतुक केले. संस्थेला आता २३ वर्षे पुर्ण झाली आहेत.

विद्यार्थ्यांच्या कौतुकासोबत मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर योग्य ते संस्कार करावेत. मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी चांगले उपक्रम राबवावेत. पालकांनी विद्यार्थ्यांना मोबाईल पासून दूर राहण्यासाठी वाचनाची आवड निर्माण करावी. स्वच्छता, योग्य आहार व चांगल्या सवयी लावण्याचे आवाहन देखील केले.

संस्थेचे अध्यक्ष यांनी कोठेकर यांच्याबद्दल बोलताना सांगितले की, भाई, आपण मुंबईहुन एवढ्या लांब खास कार्यक्रमाला आलात. आमच्या छोट्या मुलांना व शिक्षकांना प्रोत्साहन दिले. शेवटपर्यंत हजर राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. शिवाय संस्थेला दहा हजार रुपयांचे अर्थसाह्य केलेत आपले मनःपूर्वक आभार!

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक चिंतामणी मोकल यांनी आपल्या खास शैलीत केले. तसेच शेवटी सर्वांचे आभार देखील त्यांनीच मानले.

Post a Comment

Previous Post Next Post