अन् भरधाव कारने महिलेला फरफटत नेले

 
गडचिरोली मागून येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने महिला दुचाकीवरून कोसळली. यात ती जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास धानोरा मार्गावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर घडली.

सिंधू धर्मा पोटावी (२५, रा. जमगाव ता. गडचिरोली) असे जखमी महिलेचे नाव आहे. ती पती व दोन मुलांसोबत कामानिमित्त गडचिरोली येथे आली होती. काम आटोपून पोटेगावमार्गे आपल्या गावाकडे जाण्यासाठी हे कुटुंब निघाले होते. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली.

या धडकेत महिलेची दोन मुले व पती बाजूला पडले, तर सिंधू ही कारमध्ये सापडली. काही अंतरावरापर्यंत तिला कारने फरफटत नेले. यात तिच्या डोक्याला मार लागला. कारचालकाने तिला तत्काळ दवाखान्यात भरती केले. उपचार करून तिला सायंकाळी घरी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे.


Post a Comment

Previous Post Next Post