ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा गोळीबारात मृत्यू, पोलीस अधिकाऱ्यानेच केला हल्ला



ओडिशाचे आरोग्यमंत्री नबकिशोर दास यांचा एका पोलीस अधिकाऱ्यानेच केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

आज (रविवार, 29 जानेवारी) दुपारी झारसुगडा येथे त्यांच्यावर जीवघेणा गोळीबार करण्यात आला होता.

या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर नबकिशोर दास यांना एअरलिफ्ट करून उपचारांसाठी भुवनेश्वरला हलवण्यात आलं होतं.

नबकिशोर दास हे झारसुगडा येथे एका प्रचारसभेत सहभागी होण्यासाठी गेले होते. मात्र, एका पोलिस अधिकाऱ्यानेच त्यांच्यावर हल्ला केला. नबकिशोर यांच्यावरील हल्ल्याचं हे प्रकरण तपासासाठी गुन्हे शाखेकडे देण्यात आलं आहे.

हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या दास यांना भुवनेश्वरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं अनेक डॉक्टरांकडून त्यांच्यावर शस्त्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. मात्र, अनेक प्रयत्नांनंतरही डॉक्टर नबकिशोर दास यांचे प्राण वाचवू शकले नाहीत.

मुख्यमंत्र्यांकडून शोक
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नबकिशोर दास यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

घटना अतिशय धक्कादायक होती. डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले, मात्र त्यांना वाचवलं जाऊ शकलं नाही, असं पटनायक यांनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले, “नबकिशोर हे सरकार आणि पक्ष या दोहोंसाठी एखाद्या संपत्तीप्रमाणे होते. त्यांनी लोकांच्या उपयोगासाठी आरोग्य विभागात अनेक नवे उपक्रम सुरू केले आणि त्यांना यशही मिळवून दिलं. एक नेता म्हणून बीजू जनता दलाचा मजबुती देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचं निधन होणं ही ओडिशा राज्यासाठी मोठी हानी आहे.
सहायक पोलीस उपनिरीक्षकाकडूनच हल्ला
नबकिशोर दास यांच्यावर एका सहायक पोलीस उपनिरीक्षकानेच (ASI) हल्ला केल्याचं समोर आलं आहे.

झारसगुडाच्या ब्रजराजनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सर्बेस्वर भोई यांनी याबाबत सांगितलं, “हा हल्ला सहायक पोलीस उपनिरीक्षकानेच केला आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सध्या सुरू आहे.”

ओडिशा सरकारने या घटना तपास करण्याची जबाबदारी क्राईम ब्रांचकडे सोपवली आहे.

उपस्थितांनी काय सांगितलं?
या घटनेवेळी त्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित असलेले पेशाने वकील असणारे राम मोहन राव यांनी ANI वृत्तसंस्थेला त्याची माहिती दिली.

ते म्हणाले, “नबकिशोर दास घटनास्थळावर आले, त्यावेळी त्यांना घेण्यासाठी लोक गेले. त्यांच्यात काही सुरक्षा कर्मचारीही होते. त्याच दरम्यान एक आवाज आला. यानंतर गर्दीतून एक पोलीस अधिकारी तिथून पळाला. पळत असताना त्या पोलीस अधिकाऱ्याने आणखी गोळीबार केला. आम्हाला वाटलं, ज्याने गोळीबार केला, त्याच्या दिशेने हा पोलीस अधिकारी गोळीबार करत आहे.”

यानंतर नबकिशोर दास यांच्या छातीत गोळी लागल्याचं आम्ही पाहिलं, असं राम मोहन राव यांनी सांगितलं.

नबकिशोर दास यांच्यावरील हल्ल्यानंतर झारसगुडा परिसरात तणावपूर्ण वातावरण तयार झालं आहे. बीजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे नबकिशोर हे झारसगुडा विधानसभा मतदारसंघाचेच आमदार होते. ते 2009 पासून सलग या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होते.

Post a Comment

Previous Post Next Post