दारू विक्री करणारे गावामध्ये बाहेरील गुंडांना बोलावून गावकऱ्यांना दमदाटी व मारहाण करतात


वर्धा : वर्धा जिल्ह्यातील कवठा (झोपडी) या गावातील महिलांनी दारूविक्री तसेच अवैध धंद्यांच्या विरोधात मध्यरात्री 1 वाजतापासून नागपूर औरंगाबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक खोळंबत जवळपास पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कवठा (झोपडी) येथे मोठ्या प्रमाणात दारू विक्री तसेच अवैध धंदे होत असल्याने महिलांनी संतप्त होऊन रात्रीपासूनच चक्काजाम आंदोलन केले. जोपर्यंत पोलिस अधीक्षक घटनास्थळावर येत नाही आणि आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा यावेळी आंदोलकांनी घेतला होता. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून आश्वासन दिल्यानंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर गावांमधील परिस्थितीची पाहणी पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली.

दारू विक्री करणारे गावामध्ये बाहेरील गुंडांना बोलावून गावकऱ्यांना दमदाटी व मारहाण करतात. पोलिस प्रशासनाचे अवैध धंद्यावर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. लवकरात लवकर गावातील अवैध धंदे बंद करावे, अन्यथा गावकरी मोठे आंदोलन उभारतील, असे आंदोलनकर्त्यांनी बोलून दाखविले. आशिष वानखेडे यांच्या तक्रारीवरून शुभम लोखंडे, शिल्पा मेश्राम इतर 8 ते 9 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post