कृषी पंपाचे ८ तासाचे भारनियमन रद्द करून १६ तास विज पुरवठा करण्यात यावा


*गडचिरोली जिल्हा ओबीसी काँग्रेस कमिटीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी*

देसाईगंज-
 जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीला तोंड देत झालेली नुकसान भरपाई भरून काढण्याच्या प्रयत्नात येथील शेतकरी असतानाच करण्यात आलेल्या ८ तास वीज पुरवठ्याच्या निर्णयामुळे येथील शेतकरी अधिकच अडचणीत येण्याची दाट शक्यता लक्षात घेता सदरचा निर्णय तत्काळ रद्द करून कृषी पंपाना १६ तास सुरळीत विज पुरवठा करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा ओबीसी काँग्रेस कमिटीच्या वतिने देसाईगंज येथील महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
    दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल जिल्हा असुन जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग धंदे नाहीत.त्यामुळे येथील नागरिकांची उपजीविका धान पिकावर अवलंबून आहे. मागील तीन वर्षापासून सततच्या नापिकीला तोंड देत येथील शेतकऱ्यांनी यावर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई काढण्यासाठी उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात रब्बी धान पिकाची लागवड केली असुन यासाठी किमान १६ तास सुरळीत विज पुरवठ्याची गरज असताना महावितरण कंपनीने आठ तास भारनियमन करून वीज पुरवठा करण्याचे सुचवले आहे.यामुळे येथील धान पिक धोक्यात येण्याची शक्यता बळावली असुन कृषी पंपाना सुरळीत १६ तास वीज पुरवठा करण्याची तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार असताना आपलीच मागणी होती.
       दरम्यान सत्तेत आपलेच सरकार असताना कृषी पंपाना ८ तास वीज पुरवठ्याचा निर्णय अतिशय गंभीर व शेतकऱ्यांना पुरते उध्वस्त करणारा असल्याने हा निर्णय तत्काळ रद्द करून येथील कृषी पंपाना किमान १६ तास सुरळीत विज पुरवठा करण्यात यावा,अन्यथा विरोधात आपल्या कार्यालयाला घेराव आंदोलन करण्यात येईल,यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी आपले कार्यालय जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात नमुद केले आहे.
     निवेदन देताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते परसराम टिकले, उपाध्यक्ष नंदु नरोटे,ओबीसी काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज ढोरे,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,उपाध्यक्ष नितीन राऊत,देसाईगंज युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे,मनोहर निमजे,बालाजी ठाकरे,सुरेश मेश्राम,अरुण कुंभलवार,विलास बन्सोड, मंगेश गणविर,टिकाराम सहारे,शामराव पारधी,सोमेश्वर दिवठे,यादव पारधी,सचिन ठाकरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post