नागझिरा येथील वनरक्षकाला मारहाण, मोटारसायकलही जाळली. #gondiya



गोंदिया, : तिरोडा वनविभागात येत असलेल्या नागझिरा वनक्षेत्रात कार्यरत असलेल्या वनरक्षकाला मारहाण करून त्याची मोटारसायकल जाळल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. नितेश मनोहर राऊत ( 29, रा. झांजीया ) असे मारहाण करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी नितेशचा मित्र वनरक्षक अमित मुलचंद नाईक (रा. तिरोडा ) याच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार 15 फेब्रुवारी रोजी फिर्यादीचा मित्र वनरक्षक नितेश राऊत हा त्याच्याकडे अत्यंत भेदरलेला व चिखलाने माखलेल्या अवस्थेत आला. यावेळी त्यास याबाबत विचारणा केली असता त्याने सायंकाळी साडेसातच्या सुमारास झांजीयावरून दुचाकीने तिरोड्याकडे येत असताना इंदोरा खुर्द गावाजवळील वाघदेव परिसरात बोदलकसा तलावाच्या बाजूच्या डांबरी रस्त्यावर पाच-सहा व्यक्तींनी

त्याची दुचाकी अडवून शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली. तर दुचाकीही पेटवून दिल्याचे सांगितले. त्या दरम्यान, दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार देऊ असे म्हणत रात्री दोघेही झोपी गेले. मात्र, पहाटे नितेश परत येतो, असे म्हणून निघून गेला. परंतु, परत आला नाही. यावर फिर्यादी वनरक्षक अमित नाईक याला संशय आल्याने त्याने तिरोडा पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. यावर तिरोडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक ईश्वर हनवते करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post