प्रेम जरपोतवार यांची राज्यस्तरीय युवा संसदकरिता निवड*



राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे दि. १८ व १९ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर चा विद्यार्थी प्रेम जरपोतवार करणार आहे. राज्यातील विविध प्रश्न युवकांच्या माध्यमातून पुढे यावे, यासाठी राज्यातून ७८ जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातून प्रेम जरपोतवार याची निवड झाली आहे, ही बाब चंद्रपूरकरांसाठी व समाजकार्य महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व, वाद-विवाद स्पर्धांमधून प्रेमने यश संपादन केले आहे. राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार प्रेमला मिळाला आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना येथील रहिवासी असून प्रचंड प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत व संघर्ष करत मनात जिद्द बाळगून त्याने ही उंच भरारी घेतली आहे. एस. आर. एम समाजकार्य महाविद्यालयात एम. एस डब्ल्यू प्रथम वर्षात शिकत असलेल्या प्रेमची निवड गोंडवाना विद्यापीठ , गडचिरोली विद्यापीठामार्फत झाली आहे.युवा संसदसाठी निवड झाल्याबद्दल प्रेमने महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, आई वडील, ताई, भाऊ व मित्र परिवाराचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post