कुरखेडा : तहसीलदार यांची अवैध रेती विरोधात धडक कारवाई


कुरखेडा; (प्रतिनिधी); ११ जून: कुरखेडा येथील तहसीलदार राजकुमार धनबाते यांच्या नेतृत्वात भरारी पथकाने शनिवारी रात्री उशिरा कुरखेडा येथील सती नदीत अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन वाहनांवर कार्यवाही केली. अवैध उत्खनन करतांना पकडलेले ट्रॅक्टर तहसील कार्यालयन कुरखेडा जमा करणे करिता नेत असताना एक ट्रॅक्टर पसार झाला असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहिती नुसार येथील तहसीलदार राजकुमार धनबाते यांना कुरखेडा तालुक्यात मोठ्याप्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली होती. या वाळू उपसा करणर्या लोकांवर मागील तीन दिवसापासून पाळत ठेवण्यात आली होती. कुंभिटोला येथील सती नदी पात्रात ट्रॅक्टर वाळू भरून निघत असल्याची माहिती मिळताच नियोजित भरारी पथकाने पाठलाग करत तहसील कार्यालय समोर ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३४ ए पी ३११२ याला वाळूसह पकडले. त्या नंतर लगेच सती नदी येथील वाळू भरत असलेले दोन ट्रॅक्टर मोक्यावर पकडले. सती नदीत ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३३ एफ ४८११ व एम एच ३३ वी ३२३७ असे दोन्ही ट्रॅक्टर भरारी पथकाच्या हाती लागले. पकडले ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करणे करिता नेत असताना ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३३ वी ३२३७ घेवून पसार झाला. या घटने नंतर सुरक्षेच्या दृष्टीने पकडलेले दोन्ही ट्रॅक्टर कुरखेडा पोलिस स्टेशनच्या आवारात नेवून ठेवले. प्राप्त माहितीनुसार कुरखेडा येथील तुषार कुथे, तळेगाव येथील सचिन सहारे व मालदुगी येथील महेंद्र सहारे यांचे मालकीचे ट्रॅक्टर असल्याने त्यांचेवर गौण खनिज कायद्या अंतर्गत प्रकरण दाखल केल्याची माहिती तहसीलदार कुरखेडाने दिलेली आहे.



कारवाईनंतर घटनास्थळावरून पसार झालेला ट्रॅक्टर एम एच ३३ वी ३२३७ हा यापूर्वीही दोनदा वाळू उपसाच्या प्रकरणात अडकला असल्याची माहिती समोर आली आहे. तिसऱ्यांदा अडकलेल्या सदर ट्रॅक्टर संदर्भात जप्तीची कारवाई होणे अटळ असल्याचे समजतात सदर ट्रॅक्टर चालक व मालक यांनी तहसील कार्यालयाकडे ट्रॅक्टर नेत असल्याचा भासवत मध्य रस्त्यातून सदर ट्रॅक्टर इतरत्र वळवून पसार झाले असल्याची माहिती आहे. आता सदर ट्रॅक्टर वर दंडात्मक कार्यवाही सोबतच फौजदारी दाखल होणार असल्याची माहिती आहे.

Post a Comment

Previous Post Next Post