भाजपकडून लोकसभेसोबत विधानसभेचीही तयारी सुरू

मतदार संघनिहाय निवडणूक प्रमुखांच्या नावांची घोषणा



गडचिरोली : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूकही होण्याची शक्यता पाहता भारतीय जनता पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. त्यासाठी वेळीच संघटनात्मक मोर्चेबांधणी करता यावी म्हणून लोकसभा आणि विधानसभा क्षेत्राच्या निवडणूक प्रमुखांच्या नावांची घोषणा गुरूवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख म्हणून गडचिरोली भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख म्हणून ज्येष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, अहेरी विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम, तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. परंतू ज्या पद्धतीने भाजपने तयारी सुरू केली आहे त्यावरून दोन्ही निवडणुका एकत्र होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विशेष म्हणजे बहुतांश ठिकाणी जे संभावित उमेदवार आहेत त्यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेली नाही. मात्र अहेरी मतदार संघात अंब्रिशराव आत्राम हे भाजपचे संभावित उमेदवार असताना त्यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post