देणगीवर खड्डे फ्री! एकावर एक फ्री!

    
        ही होलसेल साडी दुकानावरची जाहिरात नाही.ही आहे राजकीय दुकानावरची जाहिरात.देणगीवर खड्डे फ्री.
       गणपती उत्सव आला .हे आता कैलेंडर मधे पहावे लागत नाही.गल्ली बोळात वर्गणी मागणारे टोळी दिसली कि समजावे , गणपती उत्सव आला.
         जळगाव शहरातील अनेक गणपती मंडळांनी खातेफोड केली आहे.काहींनी आणेवारी लावली आहे.काही मंडळांनी तर गुंठेवारी वर उत्सव मांडले आहेत.एकाचे दोन.दोनाचे चार.चाराचे आठ.असे गुणाकार पद्धतीने गणपती मंडळांची संख्या वाढलेली आहे.
    गणपती उत्सव मनवणे यात श्रद्धा कमी आणि मलिदा जास्त असतो.आताच जळगाव महापालिका कार्यकाळ संपला आहे.निवडणुक तोंडावर आली आहे.म्हणून माजी नगरसेवक आणि भावी उमेदवार मजबुरीने देणगी देणारच.मंडळ म्हणते," वाटरग्रेस मक्तेदार, अमृत योजना ठेकेदार, रस्ते, गटारींचे मोठे कमीशन मारलेले आहे.तर मग द्या वर्गणी." कमीशनखोरीचे पापाचे परिमार्जन करण्यासाठी द्यावेच लागते.नाहीतर निवडणुकीत हिच पोरं इंगा दाखवतील.म्हणून यांचेशी पंगा नको.
" ढॅं ढॅं ढॅं देऊन टाक.दे दे दे देऊन टाक."
    आमदारांनी रस्ता गटार पाणी सफाई बाबत काहीच काम केले नाही.ही प्रसिद्धी खूप झाली आहे.आता पुढील तिकीट कट होऊ शकते.अशी हवा आधीच पसरली आहे.म्हणून आमदार सुद्धा सढळ हाताने देणगी देत आहेत.त्यांचेकडे मंडळांची, जेष्ठ नागरिक संघांची यादी असते.जर एखादे मंडळ किंवा जेष्ठ नागरिक संघ आले नाहीत तर कार्यालयातून फोन जातो."का हो!या वर्षी गणपती बसवला नाही का?वर्गणी घ्यायला आले नाहीत म्हणून विचारतो."इतक्या अदबीने,उदारपणे कोणी देत असेल तर घ्यायला काय हरकत आहे? म्हणून अनेक मंडळांनी आमदार कडून प्रेरणा घेऊन गणपती बसवण्याचे कष्ट घेतलेले आहे.जेष्ठ नागरिक संघाने तर आमदारांना बोलवून भरीत बट्टी चे भोजन दिले.ते काही संघाकडून नाही.आमदारांचा गहू आणि आमदारांना जेवू.उरले तर घरी घेऊन जाऊ.
     जळगाव शहरातील फक्त भाजप,अभाविप,बजरंग दल नव्हे कांग्रेस, कम्युनिस्ट,आरपीआय प्रणित संघटना सुद्धा आमदारांच्या आर्थिक मदतीवर कार्यक्रम घेतात.त्यामुळे भाजप विरोध,मोदी विरोध, फडणवीस विरोध जातीविरोध वगैरे फक्त सांगायच्या गोष्टी राहिलेल्या आहेत.जर कोणतीही संघटना,मंडळ आर्थिक मदत घेत असेल तर उपकृत राहिलच.ऋणी राहिलच.खाल्लेल्या अन्नाला जागणारच.
      शहरातील अनेक मंडळांनी बैठक घेऊन रस्ता आणि खड्डा बाबत खेद व्यक्त केला.याचा इनडायरेक्ट परिणाम देणगी वर होतो.रस्त्यावरील खड्डा कसा भरणार?हा प्रश्न सतावतो.पण डोक्यातील खड्डा भरणे मात्र सोपा मार्ग सापडतो.द्या देणगी आणि व्हा मोकळे. मंडळाचे सभासद सुपभर मिळाले कि ओंजळभर पसायदान टाकतात." साहेब , आमच्या मंडळाच्या आरतीला या,बर का!" 
     आमचे धार्मिक कर्मकांड आर्थिक व्यवस्थेवर अवलंबून आहेत.तो स्रोत राजकीय नेत्यांकडे आहे.त्यांना आपल्या मताची गरज आहे.म्हणून याच वेळेला लोटा घेऊन ताक मागणारे पर्वणी समजतात.एकदा कि,ताक मिळाले कि मालकासोबत म्हशीचे,पारडूचे,हेल्याचेही कौतुक करावे लागते.असे ताक मागणारी माणसे कितीही एकत्र आलीत तरीही रस्ता आणि खड्डा बाबत तक्रार करू शकत नाहीत.केली तरी ती लडिवाळ असते.गुलू गुलू असते.हलू हलू असते.अलवार असते.त्या तक्रारीला धार नसते.तिचा वार होत नाही.फक्त गुदगुल्या होतात.ज्याने बोट लावले तो ही स्माईल करतो.ज्याला बोट लागले तोही स्माईल करतो.
    देणगीचा पैसा कुठून येतो?तो काही,शेत,घर, दागिने विकून देत नाहीत.तो काही रेती,दारू,सोने , सट्टा पेढी तून येत नाही.तो येतो रस्ता गटार पाणी सफाई या योजनेतूनच.त्यातून मिळालेल्या कमीशन मधूनच.जर घरे दारे विकून देणगी दिली असती तर कंगाल होऊन अनेक नगरसेवक व आमदारांनी आत्महत्या केली असती.पण अजूनतरी तशी कर्जबाजारी होऊन कोणीही नगरसेवक किंवा आमदाराने आत्महत्या केली नाही.देणगी देणे डॉक्टर प्रोफेसर इंजिनिअर वकिल व्यापारी यांना परवडत नाही. कलेक्टर, एसपी ला परवडत नाही.तर मग नगरसेवकांना कसे काय परवडते?आमदारांना कसे काय परवडते? नगरसेवक आणि आमदार तुमच्याच ताटातील चोरलेले तुम्हाला वाटतात.त्यामुळे कंगाल,भिकार होण्याची शक्यता नसतेच.
    जर कोणी एखादा दिडशहाणा, एहसानफरामोश देणगी घेऊनही तक्रार करीत असेल,टॉंट मारत असेल तर त्याला इतर समजावून सांगतात.
" देणगी सोबत खड्डे फ्री मिळाले आहेत. एकावर एक फ्री.देणगी सोबत खड्डा फ्री. खड्डे नको असतील तर देणगी घेऊ नका.आधीच ठरवून घ्या,देणगी पाहिजे कि रस्ता?"

... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Post a Comment

Previous Post Next Post