आई, तू माझा जीव का घेतला? शेजाऱ्याशी रोमान्स करताना आईने ३ वर्षाच्या लेकाला संपवलं, मग रोज रात्री जे दिसलं

 

बाळासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या थोर मातांच्या देशात मन हादरवून टाकणारी एक घटना घडल्याचे समोर येत आहे. एका आईने आपल्या ३ वर्षाच्या पोटच्या गोळ्याला घराच्या छतावरून ढकलून दिले आणि त्यात त्या चिमुकल्या जीवाचा अंत झाल्याचे समजतेय. बाळाच्या मृत्यूच्या चार महिन्यानंतर आता स्वतः आईने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. असं म्हणतात गुन्हेगारालाच अनेकदा त्याचं मन खात असतं. एखाद्याच्या मृत्यूला कारण ठरलेल्या व्यक्तीला त्या मृताचा सतत भास होणे, ती व्यक्ती जाब विचारतेय असं वाटणं हे कित्येक चित्रपटांमध्ये तुम्हीही पाहिलं असेल. असाच काहीसा प्रकार या आरोपी मातेच्या बाबत घडल्याने आता अखेरीस तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. नेमकं हे प्रकरण काय हे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.


२८ एप्रिल म्हणजे साधारण चार महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये पोलीस हवालदार ध्यान सिंग यांनी आपल्या नव्या दुकानाच्या उद्घाटनासाठी सर्व शेजाऱ्या- पाजाऱ्यांना आमंत्रण दिले होते. यावेळी त्यांचा शेजारी उदय इंदोलीया हा सुद्धा आला होता. उदय हा ध्यान सिंह यांची पत्नी ज्योती हिचा प्रियकर होता. सर्वजण कार्यक्रमात व्यग्र असताना उदय आणि ज्योती घराच्या गच्चीवर गेले आणि तिथे त्यांचा रोमान्स सुरु झाला. यावेळी आईच्या पाठोपाठ ज्योती यांचा तीन वर्षांचा चिमुकला जतीन सुद्धा गच्चीवर गेला

यावेळी जतीनने आपल्या आई व उदयला नको त्या स्थितीत पाहिले. आपल्या मुलाला पाहून ज्योती घाबरली आणि घाबरलेल्या अवस्थेत तिने गोंधळून जाऊन आपल्याच लेकाला गच्चीवरून खाली ढकलले. दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने जतीनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात न्यावे लागले. जय आरोग्य अशा रुग्णालयात त्याच्या उपचार सुरु असताना २९ एप्रिल २०२३ ला त्याचा मृत्यू झाला. यानंतर सर्वांनी ध्यानसिंग व ज्योती यांच्या निष्काळजीपणामुळे मुलगा गच्चीवरून पाय घसरून पडला असावा अशी चर्चा सुरु केली, ज्योतीने सुद्धा याच चर्चांना दुजोरा दिला.

पण काहीच दिवसात ज्योतीला रात्रीची भयंकर स्वप्न पडू लागली. तिला जतीन तिच्या स्वप्नात येऊन आपला जीव का घेतला असे विचारू लागला. हे भास तिच्या मनाला पोखरून काढत होते. शेवटी, तिने पोलीस पतीकडे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. ज्याचे पुरावे व्हिडीओ ऑडिओ स्वरूपात गोळा करून त्यांनी पोलिसांकडे जमा केले. यानंतर ज्योती व उदय दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

TOI च्या माहितीनुसार ज्योती व ध्यानसिंह यांना दोन मुले होती आणि त्यात जतीन हा ज्योतीचा लाडका लेक होता. जेव्हा तिने त्याला ढकललं तेव्हा त्याचा मृत्यू होईल असं तिला वाटलं नव्हतं. तो पाय घसरून पडला आणि मग त्याला थोडंसं लागलं असं ती सर्वांना भासवणार होती.

Post a Comment

Previous Post Next Post