12 विचा पेपर फुटला नाही- शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती


मुंबई : बारावीचा केमिस्ट्री विषयाचा पेपर फुटलाच नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत दिली. प्रश्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या विषयावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करत सभागृहाला या प्रकरणाबाबत माहिती दिली.

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, नियमानुसार सकाळी १०.२० वाजता प्रश्नपत्रिकेचं वाटप झालं होतं. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.२४ वाजता आढळून आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा संपूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
त्यानंतर हा मोबाइल ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचा भाग आढळणे ही गंभीर बाब असून भविष्यात असे प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोचिंग क्लासेसमधील शिक्षकाला अटक
मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मुकेश यादव असं या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स ॲपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची चौकशीदेखील केली आहे. पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याआधीदेखील पेपर फुटलेत का, आदी मुद्यांवरही पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला केमिस्ट्रीचा पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला याची माहितीदेखील पोलीस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार फक्त तीन विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post