शेतकऱ्याचा नाद करायचा नाय! शेत राखण्यासाठी 'अस्वल' ठेवलं नोकरीला; १५ हजार पगार


तेलंगणा:-पक्षी-प्राण्यांमुळे शेताचं किती नुकसान होतं याची कल्पना शेतकऱ्यांनाच सर्वाधिक असते. मोठ्या कष्टानं पिकवलेल्या शेतीचं प्राण्यांमुळे मोठं नुकसान होतं. त्यामुळे शेतकरी काही ना काही युक्त्या, क्लृप्त्या लढवत असतो.

बरेचजण शेतात बुजगावणी उभी करतात. मात्र तेलंगणातल्या शेतकऱ्यानं वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यानं शेतीच्या संरक्षणासाठी चक्क एक अस्वल नोकरीवर ठेवलं आहे.

शेतकरी भास्कर रेड्डी यांनी खरंखुरं अस्वल शेतात नोकरीला ठेवलेलं नाही. त्यांनी एका व्यक्तीला नोकरी दिली आहे. ही व्यक्ती त्यांच्या शेतात अस्वल बनून पहारा देते. माकडांनी शेताचं नुकसान करू नये याची काळजी घेण्याचं काम ही व्यक्ती करते. रेड्डी तेलंगणातल्या सिद्दिपेटचे रहिवासी आहेत.

माकडं, जंगली डुकरांपासून शेताचं रक्षण करण्यासाठी भास्कर रेड्डींनी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यांच्या शेतात अस्वलाचा पोशाख घालून एक व्यक्ती फिरत असते. त्याला रेड्डींनी नोकरीवरच ठेवलं आहे. शेतीची राखण करण्यासाठी रेड्डी त्याला दिवसाला ५०० रुपये देतात. अस्वलाच्या वेशात वावरणाऱ्या या माणसाची आणि त्याला कामाला ठेवणाऱ्या रेड्डींची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post