त्या' महामार्गाने घेतला 60 जणांचा बळी - सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग ठरतोय जीवघेणा

गडचिरोली:जिल्ह्यातील बहूचर्चित आलापल्ली-सिरोंचा या 353 सी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम संबंधित विभागांतर्गत मागील पाच वर्षापासून सुरु आहे. मात्र या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने या मार्गाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. मागील पाच वर्षाच्या कालावधीत या राष्ट्रीय महामार्गाने तब्बल 60 जणांचे बळी घेतले असून तीन डझनभर नागरिकांना गंभीर व किरकोळ जखमी केल्याची भयावह माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये पुढे आली आहे. सदर राष्ट्रीय महामार्ग प्रवासी व वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत असताना यास जबाबदार असलेल्या संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
बॉक्ससाठी...
अपघातात 21 गंभीर जखमी
सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मागितल्या माहितीनुसार सिरोंचा-आलापल्ली या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेमुळे 2017 ते 2021 या पाच वर्षाच्या कालावधीत शेकडो अपघात घडले आहेत. यामध्ये तब्बल 60 जण ठार झाले असून 21 गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये 2017 साली 7 ठार 4 गंभीर तर 2 किरकोळ जखमी आहेत. सन 2018 मध्ये 6 ठार, 3 गंभीर तर 2 किरकोळ, सन 2019 मध्ये 2 ठार, प्रत्येकी 3 गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. सन 2020 मध्ये 5 ठार, 6 गंभीर तर 3 किरकोळ तर सन 2021 मध्ये 5 गंभीर व 4 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
बॉक्ससाठी...
संबंधित अधिकारी, कंत्राटदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
या मार्गावर 60 जणांचे बळी गेले असून अनेकांना अपंगत्व आले आहे. सदर गंभीर प्रश्नाला घेऊन सातत्याने अनेक कार्यालयात तक्रारी करीत जिल्हाधिकारी, पालकमंत्री आदींना निवेदनही सादर करण्यात आले. मात्र न्याय न मिळाल्याने सदर रस्ता बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कार्यवाही करण्यासाठी नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सद्यस्थिती सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या मार्गावर जीवितहानी गंभीर दुखापती संदर्भात अपघात घडू आले असल्याने यास सर्वस्वी जबाबदार असणा-या संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतोष ताटीकोंडावार यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.
बॉक्ससाठी...
राष्ट्रीय महामार्गावर 120 कोटी खर्ची
माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीनुसार सिरोंचा उपविभाग अंतर्गत सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 सी या रस्ता बांधकामाकरिता तब्बल 120 कोटी आतापर्यंत खर्ची घातल्या गेल्याची माहिती आहे. यामध्ये रस्ता बांधकाम व देखभाल दुरुस्ती कामाचा समावेश आहे. मागील पाच वर्षात सदर मार्गावर शेकडो कोटी खर्च झाले असतांना रस्त्याची स्थिती आजही भयावह आढळून येत असल्याने शासनाच्या कोट्यावधी रुपयाची वासलात लागल्याचे यात स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे या रस्ता बांधकामाची सखोल चौकशी करुन संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post