आमदाराच्या विरोधात बातमी लावली म्हणुन पोलिसांनी उघडं करून मारलं?

मध्य प्रदेश:- राज्यात मानव अधिकारांचे होणारे हनन काही नवीन बाब राहिलेली नाही मात्र आता चक्क मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात पत्रकारांना नग्न करून पोलीस ठाण्यात उभे करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना केवळ अंतर्वस्त्र परिधान करून पोलीस ठाण्यात ठेवले आणि या पत्रकारांची समाजात बदनामी व्हावी यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक हे छायाचित्र व्हायरल केले. त्यांनी भाजप आमदाराच्या विरोधात बातम्या चालवल्याने त्यांना अशी वागणूक दिल्याचा आरोप आहे.

मध्यप्रदेशातील कोतवाली पोलीस ठाण्यात पोलीसांकडून पत्रकारांशी गैरवर्तन करत अर्धनग्न अवस्थेत उभे केल्याचे प्रकरण आता जोर धरू लागले आहे. सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्टेशन प्रभारी आणि पोलीस उपनिरीक्षकांना धारेवर धरण्यात आले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता सिधीचे पोलीस अधीक्षक मनोज श्रीवास्तव यांचे वक्तव्य समोर आले असून , ‘ आम्ही याची चौकशी करत असून लवकरच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल ‘ असे मिळमिळीत उत्तर देण्यात आले आहे.

मध्य प्रदेश पोलिसांनी चक्क नग्न करून भाजप आमदाराविरोधात बातम्या लिहिणाऱ्या पत्रकारांना पोलिस ठाण्यात उभे केले यातील बहुतांश पत्रकार स्वतःचे यूट्यूब चॅनलही चालवतात. मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचे पोलीस गुंडगिरीवर उतरले असल्याचे दिसून येत आहे. ज्येष्ठ पत्रकार डॉ राकेश पाठक यांनी ट्विटमध्ये या फोटोबद्दल सांगितले आहे की, हे सर्व पत्रकार मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील आहेत. त्यांनी लिहिले आहे की, एमपीच्या सिधी जिल्हा पोलिसांनी पत्रकारांना अर्धनग्न अवस्थेत पोलिस ठाण्यात उभे केले आहे.

केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांना देखील यूपी सरकारने गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात डांबून ठेवले होते, त्यांचा दोष हा होता की ते राज्यातील बलात्कार प्रकरण हातरस घटनेचे कव्हरेज करण्यासाठी जात होते. तसेच काश्मीरमध्येही अनेक पत्रकारांना कामापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले आहेत. कोणत्याही लोकशाहीत स्वतंत्र पत्रकारिता महत्त्वाची भूमिका बजावते, परंतु गेल्या काही वर्षांत भारतातील पत्रकारिता अत्यंत कठीण काळातून जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post