...अन् इंजिनियरिंगचा विद्यार्थी बनला चोर

मूल :- अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा मूल येथील एक १९ वर्षीय तरुण आपल्या इतर गरजा भागविण्यासाठी चक्क चोर बनला. माधुरी अशोक अलोने यांच्या घरी चोरी करण्याच्या प्रयत्नात तो पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याविरुध्द पोलिसांनी कलम ३८०, ४५७, ५११अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

नागपूर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात हा तरुण शिक्षण घेत होता. त्यामुळे तो नेहमी मूलला आई वडिलांकडे येत होता. मात्र, इतर गरजा भागविण्यासाठी त्याला पैशांची गरज भासू लागली. यातून त्याने चोरीचा मार्ग निवडला. त्याने चक्क नगर परिषद मूलचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांच्या घरी प्रवेश करून लॉपटॉप, हार्ड डिस्क व टॅबची चोरी केली. तसेच मूल येथील भारतीय स्टेट बैंक व अॅक्सिस बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचाप्रयत्न केला. मूल येथील एका राजकीय पक्षांच्या नेत्याच्या घरी महागड्या मोबाईलची चोरी केली. या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळत नसल्याने या तरुणाची हिंमत वाढत गेली. ११ एप्रिल २०२२ रोजी रात्री २ वाजण्या सुमारास चोरी करण्यासाठी तो वार्ड न. १६ मधील रेल्वे स्टेशनजवळील माधुरी अशोक अलोने यांच्या घरी गेला असता परिसरातील नागरिक जागे झाले. वार्डातील सामाजिक कार्यकर्ते राहुल महाजनवार यांनी पोलिसांना बोलावून घेतले. त्यावेळी हरिश पुनकेटवार यांच्या शौचालयाच्या मागे तो लपून बसल्याचे दिसून आले. मूलचे पोलीस निरीक्षक सतीशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम राठोड व चमूने मोठया शिताफीने त्याला पकडले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली.

Post a Comment

Previous Post Next Post