यूपी बोर्डाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी प्रसिद्ध करणार्‍या तीन पत्रकारांना अटक योगी सरकारच्या आदेशाने उत्तर प्रदेश पोलीसांची अरेरावी, अटकेचा निषेध

यूपी बोर्डाच्या इंटरमिजिएट इंग्रजी प्रश्‍नपत्रिका फुटल्याची बातमी प्रसिद्ध करणार्‍या बलिया येथील तीन पत्रकारांना योगी सरकारच्या आदेशाने उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. पोलीसांच्या या अरेरावीविरोधात बलिया कोतवालीत पत्रकारांनी निदर्शने केली आहेत, तर अनेक नेत्यांनीही पत्रकारांच्या अटकेचा निषेध केला आहे.

बुधवारी इंटरमिजिएट इंग्रजी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फुटली आणि सोडवलेली प्रश्नपत्रिका इंटरनेटवर व्हायरल झाली. यानंतर २४ जिल्ह्यांमध्ये इंग्रजीची परीक्षा रद्द करण्यात आली.या प्रकरणी बलियाच्या शाळांच्या जिल्हा निरीक्षकांनाही निलंबित करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी एकूण २२ जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यात अजित कुमार ओझा, दिग्विजय सिंग आणि मनोज गुप्ता या तीन पत्रकारांचा समावेश आहे. 
यातील दोन पत्रकार- अजित ओझा आणि दिग्विजय सिंह अमर उजाला या वृत्तपत्राशी संलग्न आहेत. या अटकेबाबत अजित ओझा आणि दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य सोशल मीडियावर आले आहे. प्रश्‍नपत्रिका फुटल्याची बातमी त्यांनी आपल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केली होती. परंतु योगी सरकारने त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे त्यांना पोलीसांनी अटक केली.
दरम्यान, पोलिस आणि प्रशासनावर छळवणूक होत असल्याचा आरोपही त्या पत्रकारांनी केला आहे. नागरा, भीमपुरा, बेलथरा परिसरात खुलेआम कॉपी केल्या जात असून, प्रशासनाला ते रोखता येत नसल्याचे सांगितले. या अटकेवर प्रतिक्रिया देताना एसपीचे म्हणाले, सरकारच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 
नागरा, बलिया येथील आणखी एक पत्रकार मनोज गुप्ता यांनाही याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. प्रश्‍नपत्रिका फोडणार्‍या कॉपी माफियांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासन पत्रकारांना लक्ष्य करत असल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे.
-०-

Post a Comment

Previous Post Next Post