*रामनामाच्या गजरात रामनवमीला निघणार भव्यदिव्य शोभायात्रा* *शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण- नेत्रदीपक "रांगोळी", पालखी,घोडे,रथ, भजन, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी*

वणी : परशुराम पोटे

प्रभू श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीनं रामनवमीनिमित्त रविवार दिनांक १० एप्रिल रोजी वणी शहरात रामनामाच्या भव्यदिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. वणी च्या सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक वैभवात भर घालणारी रामनवमी शोभायात्रा गेली दोन वर्ष कोरोना परिस्थितीत असलेल्या निर्बंधांच्या कारणामुळे आयोजित करण्यात आली नव्हती. मात्र यावर्षी सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे रामनवमी शोभायात्रा आकर्षक आणि आदर्शवत अशीच होईल यादृष्टीने श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समिती अहोरात्र झटत आहे. जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरातून श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्तींचे विधिवत पूजन होऊन या शोभायात्रेला दुपारी ४ वाजता प्रारंभ होईल. यंदा नवीन कलाकृतीसह साकारण्यात येणाऱ्या आकर्षक अशा सुशोभित रथामध्ये हा रामदरबार विराजित असणार आहे. विशेष म्हणजे या शोभायात्रेत एक नाही तर तब्बल चार रथ असुन कलावंत हे रामरथ साकारत आहे. रामरथ रामभक्तांद्वारे शोभायात्रा मार्गावर हाताने ओढण्यात येणार आहे. महिला पुरुष आबालवृद्धांच्या या सर्वसमावेशक शोभायात्रेचे यंदाचे मुख्य आकर्षण पालखी,घोडे,रथ, भजन, आकर्षक रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी यासह विशेष आकर्षण म्हणजे नेत्रदीपक रांगोळी असणार आहेत. पुणे येथील प्रसिद्ध रांगोळी कलाकार भुषण खंडारे हे शोभायात्रा मार्गावरील प्रत्येक चौकात फक्त दोन मिनिटात नेत्रदीपक अशी रांगोळी काढणार असुन विदर्भात प्रथमच वणीत त्यांची कला पहायला मिळणार आहे.
 रामभक्तीमय वातावरणात निघणाऱ्या या शोभायात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी वणीकरांनी केली असून पारंपारिक मार्गावरून आयोजित शोभायात्रेच्या आयोजनासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. 
जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरातून सुरु होणारी शोभायात्रा शाम टॉकीज चौक, दिपक चौपाटी, भगतसिंग चौक (काठेड चौक), गाडगेबाबा चौक,सर्योदय चौक,टागौर चौक,टुटी कमान चौक,अणे चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौक, महाराष्ट्र बॅंक चौक मार्गे जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिरात महाआरती नंतर समापन होणार आहे.  वणीकर नागरिकांनी मोठ्या  संख्येने या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री रामजन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post