मुरुमगाव धान घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याची अविका संस्था कर्मचारी संघटनेने केली मागणी

 धानोरा / रांगी : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मुरूमगाव येथील धान अफरातफर प्रकरणात व्यवस्थापक हे एकटे जबाबदार नसून या प्रकरणासाठी तेथील प्रशासकीय यंत्रणेसह या प्रकरणाशी संबंधित असणारे सर्व व्यक्ती, त्यांच्या बँक खात्यांची संपूर्ण चौकशी करावी, जेणेकरून या जिल्ह्यातील इतर संस्थांना गालबोट लागणार नाही, अशी मागणी आविका संस्था जिल्हा कर्मचारी युनियनने धानोरा येथे पत्रकार परिषदेत केली आहे.

हे प्रकरण नेमके कोणामुळे घडले, कसे घडले, त्याला जबाबदार कोण आहेत याची सविस्तरपणे चौकशी करावी. व्यापारी व अधिकारी यांच्या संगनमतातून हा प्रकार घडला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.

सदर पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष हेमंत शेंद्रे, सचिव महेंद्र मेश्राम, मोहलीचे सचिव बी. डी. लाडे, कुरखेडाचे एल. एस. घोसेकर, येंगलखेडाचे पी.एफ. हटवार, वर्धाचे आर.बी. मस्के, देलनवाडीचे दिलीप कुमरे, रांगीचे आर. एस. हलामी कारवाफाचे डी.जे. बोरसरे यांच्यासह इतर केंद्रप्रमुख उपस्थित होते.


प्रकरणामुळे याच वर्षी केंद्राला मंजुरी कशी?

मुरुमगाव येथे यापूर्वी उन्हाळी धान खरेदी केंद्राला मंजुरी नव्हता, परंतु नेमकी याचवर्षी ती मंजुरी कशी काय दिली? त्यात कोणते सातबारा ऑनलाईन केले? सातबारावर खरीप व रब्बीची नोंद आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यात टीडीसीची वरिष्ठ पातळीवरील प्रशासकीय यंत्रणाही गुंतली असण्याची शक्यता असून या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सविस्तर चौकशी करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post