कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव नाक्यावर दोन पोते गांजा जप्त

कूरखेडा : शहरातील गोठणगाव नाक्यावर गांजा या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चार चाकी वाहनाला अडवून वाहनाची तपासणी केली असता, वाहनात दोन पोत्यांमध्ये गांजा आढळून आला. गांजा व वाहन जप्त करीत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.

मालेवाडा परिसरातून कूरखेडा मार्गे गांजाची तस्करी करण्यात येते, अशी गोपनीय माहिती कूरखेडा पोलिसांना मिळाली. मध्यरात्री मालेवाडा मार्गावरील गोठणगाव नाक्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचा मार्गदर्शनात कूरखेडा पोलिसांनी सापळा रचला होता. चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. ४६ ए. एल. ६५४५ मालेवाडा मार्गाने येत असताना वाहनावर संशय आला.


वाहन थांबवून झडती घेतली असता दोन पोत्यांमध्ये २४ किलो ७०० ग्राम सुखा गांजा आढळला. गांजाची किंमत २ लाख ४७ हजार रुपये एवढी होते. सोबत ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन व २२ हजार रुपये किमतीचे दोन वापरते मोबाइल असा एकूण ६ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी वैभव नरेश धूळस (३०) व अनिरुद्ध देवानंद कांबळे (३१) दोन्ही रा. सिंगोरी ता. मौदा, जि. नागपूर यांना अटक केली. सदर कूरखेडा तालुक्यातून नागपूर जिल्ह्यात नेला जात होता.

Post a Comment

Previous Post Next Post