दोन सख्ख्या साळ्यांनी केली जावयाची हत्या...

एटापल्ली : जावयासोबत झालेल्या भांडणात दोन सख्ख्या साळ्यांनी त्यांना बेदम मारहाण करून जीवे मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या दुचाकी वाहनाला मृतदेह बांधून नदीत ढकलले. एखाद्या चित्रपटात शोभेल, असा हा प्रसंग प्रत्यक्षात तालुक्यातील एकरा टोला या गावात २२ जुलै रोजी घडला. तब्बल १५ दिवसांनी या घटनेचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

दिलीप राजू बारसा (२४ वर्षे) असे मृतकाचे नाव असून, तो एटापल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तोडसा ग्रामपंचायतमधील आलेंगा येथील रहिवासी होता, तर केशव पांडू मट्टामी (३० वर्षे) आणि बालाजी पांडू मट्टामी (३५ वर्षे रा. एकरा टोला) अशी हत्या करणाऱ्या आरोपी साळ्यांची नावे आहेत.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दिलीपचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले होते. त्यांना लहान मुलगी आहे. परंतु सतत कौटुंबीक वाद सुरू असायचे. एकरा टोला व आलेंगा या गावांचे अंतर १० किलोमीटर आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबांचे एकामेकांच्या घरी नेहमी येणे जाणे सुरु असायचे. २२ जुलैला दोन्ही साळे आणि त्यांचे जावई यांच्यात भांडण झाले. त्यामुळे दोन्ही साळ्यांनी जावयाची बेदम पिटाई केली. या मारहाणीत जावई दिलीप बारसा गंभीर जखमी झाले. पण त्यांना दवाखान्यात न आणता दोन्ही भावांनी त्यांना जीवे मारून टाकले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी एकरा टोला गावाजवळील बांदे नदीच्या पात्रात दुचाकीला मृतदेह बांधून नदीत ढकलले.

आठवडाभर केली शोधाशोध

ही घटना घडली त्यावेळी पाऊस जोरदार सुरू होता. त्यामुळे मृतदेह नदीत सापडलाच तर तो दुचाकीसह नदीत पडून वाहून गेला, असा देखावा करता येईल, अशी दोन्ही साळ्यांची योजना होती. इकडे २२ जुलैपासून दिलीप दिसत नसल्याने घरच्यांनी आठ दिवस दिलीपची शोधाशोध केली. अखेर कुठेच सापडत नसल्याने दिलीपच्या वडिलांनी ३० जुलैला एटापल्ली पोलीस ठाण्यात दिलीप बेपत्ता असल्याची माहिती दिली.

...अन् साळ्यांनी दिली खुनाची कबुली

■ ठाणेदार विजयानंद पाटील यांनी कौटुंबीक माहिती घेतली. दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्यांचे वेगवेगळे बयान घेतले. गावकऱ्यांकडूनही माहिती घेतली.

■ यात पाटील यांना दिलीपचे दोन्ही साळे केशव व बालाजी यांच्यावर शंका आली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच दोघांनीही अखेर हत्येची कबुली दिली.

■ त्यांच्यावर आता हत्येचा गुन्हा दाखल केला असून, दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post