आरमोरी तालुक्यातील वनखी येथील गाढवी नदीत आढळला मानवी सापळा...

फाईल फोटो
आरमोरी :- तालुका मुख्यालयापासून ६ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वनखी या गावाजवळील गाढवी नदीत अनोळखी व्यक्तीचा मानवी सापळा कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून सदर सापळा हा स्त्रीचा की पुरुषाचा हे अद्यापही सिद्ध झाले नाही.

प्राप्त माहितीनुसार वनखी येथील पाणीपुरवठा योजना ही वनखी येथील गाढवी नदीवरून घेतलेली असून, दिनांक २६ ऑगस्टला वनखी येथील पाणीपुरवठा कर्मचारी गावातील नळास पाणी सोडण्यासाठी गाढवी नदिजवळील उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या ढोल्याजवळ गेले असताना त्यांना गाढवी नदीच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत मानवी सापळा पालथा पडलेला दिसून आला. त्यांनी लगेच वनखी येथील पोलीस पाटील शेंडे यांना माहिती दिली. पोलीस पाटील शेंडे यांनी ही माहिती आरमोरी पोलीस ठाण्याला दिली. आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंगुर्डे, पोलीस हवालदार एकनाथ घोडाम यांनी घटनास्थळ गाठून प्रेताची पाहणी केली. वैद्यकिय अधिकारी यांना पाचारण करून घटनास्थळी पंचनामा करून प्रेत दफन करण्यात आले.



मात्र सदर प्रेत स्त्रीचा की पुरुषाचा हे अजूनपर्यंत कळलेले नसून सदर प्रेताच्या मांडीचे हाड पुढील तपासणीसाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील ८ दिवसांपूर्वी संपूर्ण विदर्भात सर्व नद्यांना पूर आला होता. कुणीतरी अज्ञात इसम पुराच्या पाण्यात पडून वाहत आलेला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविल्या जात आहे. अधिक तपास आरमोरी पोलीस स्टेशनचे पो. ह. एकनाथ घोडाम करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post