'एक दुजे के लिए, साथ जिएंगे साथ मरेंगे' अशी शपथ घेत त्या प्रेमीयुगुलाने चक्क विष पिऊन गाठले अहेरी पोलीस स्टेशन...

अहेरी : त्यांचे एकमेकांशी सूत जुळले. पण आपल्या प्रेमाला मान्यता मिळणार नाही म्हणून ते दोघे घर सोडून पळून गेले. मात्र घराबाहेरही आपल्या प्रेमाला साथ मिळत नसल्याचे पाहून 'एक दुजे के लिए, साथ जिएंगे साथ मरेंगे' अशी शपथ घेत त्या प्रेमीयुगुलाने चक्क विष पिऊन अहेरी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी लागलीच त्यांना रुग्णालयात दाखल केले असले तरी दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे यातील प्रियकर सज्ञान आहे, तर प्रेयसी ही अल्पवयीन मुलगी आहे.

एखाद्या चित्रपटातील प्रसंग वाटावा असा हा प्रकार अहेरीत घडल्याने पोलिसांसोबत या प्रेमीयुगुलाचे नातेवाईकही चक्रावून गेले आहेत.अहेरी तालुक्यातील बोरी येथील कृष्णा वसंत सोनटक्के असे या प्रेमकहाणीतील नायकाचे नाव आहे. गावातील एका अल्पवयीन मुलीशी त्याचे प्रेम जुळले. तिचेही त्याच्यावर तेवढेच प्रेम होते. पण कुटुंबीय, समाजआपल्या प्रेमाला स्वीकारणार नाही याची खात्री असल्याने त्यांनी गुरुवार, दि. २८ला बोरीगाव सोडले आणि ते अज्ञातस्थळी निघून गेले. इकडे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी अहेरी पोलीसस्टेशनमध्ये दाखल केली. ती कृष्णासोबत गेली हे कळल्यानंतर आणि ती अल्पवयीन असल्याने पोलिसांनी कृष्णावर अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. अहेरीचे पोलीस निरीक्षक श्यामगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे यांनी तपास सुरू केला.

दोघांची शोधमोहीम सुरू झाली. पण चार दिवस उलटले तरी त्यांचा शोध लागत नव्हता.

चिठ्ठीतील मजकुराने उडविली खळबळ

१. मंगळवारी दुपारी हे प्रेमीयुगुल अचानक अहेरी पोलीस स्टेशनमध्ये अवतरले. ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे यांच्या हातात त्यांनी एक चिठ्ठी दिली आणि ते तिथेच खाली बसले. चिठ्ठी वाचताच नरोटे यांना धक्का बसला. कारण त्या चिठ्ठीत 'आम्ही आत्महत्या करीत आहोत' असे लिहिले होते.

२ .नरोटे यांनी दोघांना औषधी वगैरे घेतली का, अशी विचारणा केली, मात्र ते काहीही बोलले नाही. त्यांनी काही विषारी द्रव्य पिले असल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आरती नरोटे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण, अहमद मुल्ला व पोलीस कर्मचायांनी त्यांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु केले.

३. जणू काही आपल्या प्रेमाचा मार्ग मृत्यूतूनच जातो, त्यामुळे मृत्यूशिव दुसरा पर्याय नसल्याप्रमाणे निश्चय करून ते दोघे पोलीस ठाण्यात आले होते. त्यामुळेच रुग्णालयात उपचार घेण्यास ते नकार देत होते.

Post a Comment

Previous Post Next Post