एटापल्लीत येत अससेली सव्वा लाखाची दारू जप्त एका आरोपीला अटक; दोन जण पळाले

एटापल्ली : नगरापासून दीड किमी अंतरावर असलेल्या वन तपासणी नाक्याजवळ शुक्रवारच्या रात्री पोलिसांच्या पथकाने एका वाहनातून येत असलेली सव्वा लाखाची दारू पकडली. यात चंद्रपूरच्या एका आरोपीला पकडण्यात यश आले असून, दोन जण पळून गेले आहेत.

एटापल्लीत चंद्रपूरकडून दारू येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शुक्रवारच्या रात्री पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, उपनिरीक्षक रविराज कांबळे आणि पथकाने
आलापल्ली-एटापल्ली या मुख्य मार्गावरील वन तपासणी नाक्याजवळ सापळा लावला. आलापल्लीकडून एक कार येताना दिसली. ती थांबवून झडती घेतली असता त्या वाहनात देशी विदेशी दारूच्या १५ पेट्या आढळल्या. त्यांची किंमत १ लाख २० हजार आणि गाडीची किंमत ४ लाख, असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. आरोपी निखिल वनकर (रा. चंद्रपूर) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे अन्य दोन सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post