शेतकऱ्याचा बेतकाठी नाल्याच्या पाण्यात झाला बुडून मृत्यू

कोरची:- तालुका मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावरील टेकाबेदड गावातील एका शेतकऱ्याचा बेतकाठी नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. दशरथ मनिराम मेश्राम (६० वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

या शेतकऱ्याची बेतकाठी नाल्याजवळ शेती आहे. शुक्रवारी सायंकाळी ते शेतीच्या कामासाठी घरून गेले होते. दरम्यान, शेतातील गुरे हाकताना नाल्याच्या काठावरून ते पाण्यात पडले. काही वेळानंतर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे गावातील एका व्यक्तीने पाहिले. त्यांनी लगेच गावात जाऊन मृतकाचा मुलगा स्वप्निल याला याबाबत सांगितले.

मुलाने गावातील पोलीस पाटील व गावकऱ्यांना सांगून घटनास्थळ गाठले. छातीभर पाण्यातून गावकऱ्यांनी मेश्राम यांचा मृतदेह बाहेर काढून घरी नेला. टेकाबेदडचे पोलीस पाटील शिवचरण मेश्राम यांनी कोरची पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर शनिवारी सकाळी मृतदेह कोरची ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.

मृतक दशरथ मेश्राम यांच्या मागे पत्नी, चार मुले व तीन मुली असा परिवार आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, चौकशी सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post