शाळेच्या मैदानावरच विष प्राशन करून शिक्षकाने आत्महत्या केल्याप्रकरणी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांसह 12 जणांविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली:- शाळेच्या मैदानावरच विष प्राशन करून शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिपक ज्ञानोबा मोरे (वय 42, रा. जयपूर, ता. सेनगाव, हिंगोली) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

ते रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील सरस्वती मानधने विद्यालयात सह शिक्षक म्हणून कार्यरत होते. याप्रकरणी मोरे यांचे बंधू राजेंद्र मोरे यांनी रिसोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांसह 12 जणांविरूद्ध रिसोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोरे यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांना सापडली असून त्यामध्ये सरपंचासह, ग्रामपंचायत सदस्य (जयपूर, ता. सेनगाव) आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. मोरे यांनी 31 जुलै रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शाळेच्या मैदानावर विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र 4 ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. मोरे यांना चार महिन्यांसाठी शाळेतून निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे ते मानसिक तणावात होते. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर तातडीने कडक कारवाईची मागणी मोरे यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post